न्यूझीलंडकडून भारताचा 19 धावांनी पराभव

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

संक्षिप्त धावफलक:
न्यूझीलंड : 50 षटकांत 7 बाद 260

मार्टिन गुप्टील 72, टॉम लॅथम 39, केन विल्यम्सन 41, रॉस टेलर 35
भारत : 48.4 षटकांत सर्वबाद 241
अजिंक्‍य रहाणे 57, रोहित शर्मा 11, विराट कोहली 45, महेंद्रसिंह धोनी 11, अक्षर पटेल 38, मनीष पांडे 12, केदार जाधव 0, हार्दिक पंड्या 9, अमित मिश्रा 14, धवल कुलकर्णी नाबाद 25, उमेश यादव 7

रांची : 'प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी नांगी टाकतात' हे वाक्‍य खोडून काढत भारताच्या तळातील फलंदाजांनी खोडून काढत न्यूझीलंडला आज (बुधवार) झुंज दिली. पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 19 धावांनी पराभव झाला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-2 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडने भारतासमोर 261 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताचा डाव 241 धावांत संपुष्टात आला.

केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. या दौऱ्यात सूर हरपलेल्या मार्टिन गुप्टीलसह टॉम लॅथमने धडाक्‍यात सुरवात केली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत 80 धावा चोपल्या होत्या. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांच्या हाती चेंडू दिला. यामुळे न्यूझीलंडची धावगती कमी झाली. पुन्हा आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नांत अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लॅथमने अजिंक्‍य रहाणेकडे झेल दिला. त्यानंतर केन विल्यम्सन आणि गुप्टील यांनीही चांगली भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडकडून मोठ्या भागीदारी झाल्या नाहीत. भारताकडून अमित मिश्राने दोन गडी, तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. रोहित शर्मा पुन्हा एकदा लवकर बाद झाला. विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणेने चांगली भागीदारी करत डाव सावरला. ईश सोधीच्या गोलंदाजीवर कोहली 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीच्या साथीत रहाणेने पुन्हा एकदा भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक झळकाविल्यानंतर रहाणेही बाद झाला. त्यानंतर भारताचे प्रमुख फलंदाज काहीही कमाल करू शकले नाहीत. फलंदाजीत बढती मिळालेला अक्षर पटेल, अमित मिश्रा, धवल कुलकर्णी आणि उमेश यादव यांनी चांगली झुंज देत भारताला विजयाच्या जवळ नेले. 49 व्या षटकात आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नांत यादव बाद झाला.

संक्षिप्त धावफलक:
न्यूझीलंड : 50 षटकांत 7 बाद 260

मार्टिन गुप्टील 72, टॉम लॅथम 39, केन विल्यम्सन 41, रॉस टेलर 35
भारत : 48.4 षटकांत सर्वबाद 241
अजिंक्‍य रहाणे 57, रोहित शर्मा 11, विराट कोहली 45, महेंद्रसिंह धोनी 11, अक्षर पटेल 38, मनीष पांडे 12, केदार जाधव 0, हार्दिक पंड्या 9, अमित मिश्रा 14, धवल कुलकर्णी नाबाद 25, उमेश यादव 7

Web Title: India lost to New Zealand in fourth ODI at Ranchi