न्यूझीलंडकडून तब्बल 13 वर्षांनी भारत पराभूत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

भारतीय संघ: 
रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, उमेश यादव. 

न्यूझीलंडचा संघ: 
मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, कोरे अँडरसन, ल्युक रॉंची (यष्टिरक्षक), अँटॉन डेव्हचिक, मिचेल सॅंटनर, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री. 

अचूक गोलंदाजीला लाभली क्षत्ररचणाची साथ 
नवी दिल्ली : न्यूझीलंडने तब्बल 13 वर्षांनी भारतीय संघाला भारतात पराभूत करीत नवा इतिहास रचला. पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने या विजयाने 1-1 अशी बरोबरी राखली. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2003 रोजी किवींनी टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला भारतात एकदिवसीय सामन्यात हरवू शकली नव्हती. 

कर्णधार केन विल्यम्सनचे जिगरबाज शतक आणि त्यानंतर अचूक गोलंदाजीला लाभलेल्या क्षेत्ररक्षणाच्या साथीमुळे न्यूझीलंडने गुरुवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सहा धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने केन विल्यम्सनच्या (118) शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 242 धावा केल्या होत्या. भारताचा डाव 49.3 षटकांत 236 धावांवर संपुष्टात आला. 

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवातच संथ होती. रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांना आज पहिल्या सामन्यासारखी आक्रमकता दाखवता आली नाही. बोल्टचा सामना करताना धडपडणारा रोहित त्याच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सॅंटनेरने कोहलीला स्थिरावू दिले नाही. रहाणे अँडरसनने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे बाद झाला. अर्थात, हा झेल संशयास्पद ठरला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव संयमाने खेळले. केदार आक्रमकतेत एकवेळ धोनीच्या एक पाऊल पुढे होता. मात्र, हेन्‍रीने त्याचा अडथळा दूर केला. साऊदीने धोनीला आपल्याच गोलंदाजीवर सुरेख टिपले. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात 41वे षटक गुप्टिलला देण्याचा विल्यम्सनचा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. त्याने त्या षटकांत अक्षर पटेल आणि अमित मिश्रा यांचे बळी मिळविले. त्यानंतर उमेश यादव आणि हार्दिक पांड्या यांनी 50 चेंडूत 49 धावांची बागीदारी करून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, आवश्‍यक धावगतीचे समीकरण सोडविण्याच्या नादात हार्दिक पांड्याने बोल्टला उचलून मारले आणि सॅंटनेरने त्याचा झेल अचूक पकडला. त्याने 30 चेंडूत 36 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत 10 धावांची आवश्‍यकता असताना साऊदीने तिसऱ्या चेंडूवर बुमराचा त्रिफळा उडवला आणि न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

तत्पूर्वी, केन विल्यमसनने शतक झळकाविल्यानंतरही इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर झटपट शरणागती पत्करल्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्येही भारतासमोर धावांचे मोठे आव्हान उभे करण्यात न्यूझीलंडला अपयश आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 242 धावांपर्यंत मजल मारली. विल्यमसनचे शतक आणि सलामीवीर टॉम लॅथमच्या 46 धावांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना अजिबात योगदान देता आले नाही. 

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झाला नाही. न्यूझीलंडच्या संघात तीन बदल करण्यात आले. गोलंदाजी भक्कम करताना न्यूझीलंडने ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री यांना संघात स्थान दिले. तसेच, डावखुरा फलंदाज अँटॉन डेव्हचिक याला संधी मिळाली आहे. 

न्यूझीलंडला पूरक असलेल्या धरमशालातील खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले होते. आता आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय संघासमोर फलंदाजीला पोषक असलेल्या फिरोजशाह कोटला मैदानावर किमान 280 धावा करण्याचे आव्हान न्यूझीलंडसमोर होते. पण त्यांची सुरवातच खराब झाली. सूर हरपलेला मार्टिन गुप्टील सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. एका अप्रतिम आऊटस्विंगवर उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर लॅथम आणि विल्यमसन यांनी 120 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. हे दोघे मैदानावर असेपर्यंत न्यूझीलंडला 275-280 धावांपर्यंत मजल मारण्याची आशा होती. पण लॅथम बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची धावगती मंदावली. धरमशालामधील सामन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या केदार जाधवने दोन गडी बाद केले होते. आजच्या सामन्यातही जाधवने लॅथमचा अडथळा दूर केला. त्यानंतर अनुभवी रॉस टेलरही फारशी कमाल करू शकला नाही. त्याची चाचपडती खेळी अमित मिश्राने संपुष्टात आणली. आक्रमक पवित्रा घेणाऱ्या कोरे अँडरसनलाही मिश्रानेच बाद केले. 

डावाच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी लागोपाठ बळी घेत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. 42 व्या षटकानंतर न्यूझीलंडचे पाच फलंदाज केवळ 33 धावा करून तंबूत परतले. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

धावफलक : न्यूझीलंड : 50 षटकांत 9 बाद 242 

मार्टिन गुप्टील 0, टॉम लॅथम 46, केन विल्यमसन 118, रॉस टेलर 21, कोरे अँडरसन 21, ल्युक रॉंची 6, मिचेल सॅंटनर नाबाद 9, अँटॉन डेव्हचिक 7, टिम साऊदी 0, मॅट हेन्री नाबाद 6, ट्रेंट बोल्ट नाबाद 5

उमेश यादव 1-38, हार्दिक पंड्या 0-45, जसप्रित बुमराह 3-26, अक्षर पटेल 1-49, अमित मिश्रा 3-60, केदार जाधव 1-11 

वि. वि. भारत : 49.3 षटकांत 235

केदार जाधव 41, महेंद्रसिंह धोनी 39, हार्दिक पांड्या 36

मार्टिन गुप्टिल 2-6, टीम साऊदी 2-52, ट्रेंट बोल्ट 2-25 

Web Title: India lost to New Zealand in second ODI at Delhi