भारताची झुंज अपयशी; इंग्लंडकडून 31 धावांनी पराभव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 August 2018

एजबस्टन : विजयाकरीता 194 धावांचा पाठलाग करणे इंग्लंडमधे किती कठीण असते हे एजबस्टन कसोटी सामन्यात दिसून आले. बेन स्टोक्सने चौथ्या दिवशी गोलंदाजीला आल्यावर विराट कोहलीला पायचित केले, तोच क्षण निर्णायक ठरला. कोहलीचा अडसर दूर झाल्यावर इंग्लंडने विजयाकडे दमदार वाटचाल केली. स्टोक्सने हार्दिक पंड्याला बाद करून इंग्लंडचा 31 धावांचा विजय नक्की केला. दोन्ही डावांत गरजेच्या वेळी फलंदाजी आणि उत्तम स्वींग गोलंदाजी करणार्‍या सॅम करनला सामन्याचा मानकरी ठरवले गेले.

चौथ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना इंग्लंडला विजय मिळवायला चार फलंदाजांना बाद करायचे होते. जिमी अँडरसनने दिनेश कार्तिकला लगेच बाद केल्याने गोलंदाजांना हुरूप आला. त्यानंतर  विराट कोहलीने हार्दिक पंड्यासह डगमगणारी नौका स्थिर केली. विराट कोहली आत्मविश्वासाने प्रत्येक चेंडू खेळत होता आणि त्याचाच कित्ता गिरवत हार्दिक पंड्याने चांगली फलंदाजी चालू केली. पहिला पाऊण तास अँडरसन-ब्रॉडची जोडी मारा करत होती. अँडरसनला चौकार मारून विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. 

हार्दिक पंड्याने ब्रॉडला तीन कडक चौकार मारल्यावर गोलंदाजीत बदल करावा लागला. गोलंदाजीची संधी मिळाल्यावर ज्यो रूटने पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. स्टोकसचा चेंडू पाय तिरका करत खेळायच्या प्रयत्नात विराट कोहली 51 धावांवर पायचित झाला आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदाने उड्या मारल्या. त्याच षटकात स्टोकसने मोहंमद शमीला बाद केले. सामना जिंकायला अजून 53 धावा करायच्या बाकी होत्या.

ईशांत शर्माने 11 धावा जमा करून जरा धुगधुगी आणली पण आदील रशीदने गुगली टाकून ईशांतला पायचित केले. 31 धावांवर चांगली फलंदाजी करणार्‍या हार्दिक  पंड्याला बेन स्टोकसने बाद करून इंग्लंडचा विजय पक्का केला. सामना यजमान संघाने जिंकला तरी एजबास्टनच्या प्रेक्षकांनी भारतीय संघाला आणि खास करून विराट कोहलीच्या खेळाचे भरभरून कौतुक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India lost test match in 31 runs