esakal | World Cup 2019: 'गब्बर' खेळीने ऑस्ट्रेलियासमोर 'विराट' आव्हान; 353 धावांचे लक्ष्य
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2019: 'गब्बर' खेळीने ऑस्ट्रेलियासमोर 'विराट' आव्हान; 353 धावांचे लक्ष्य

मिश्यांना तांव मारत शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले आणि भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352चे आव्हान उभारता आले. धवनने प्रथम रोहित शर्मासह शतकी आणि नंतर विराट कोहलीबरोबर 93 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी मोठी धावसंख्या उभारायला पाया ठरली.

World Cup 2019: 'गब्बर' खेळीने ऑस्ट्रेलियासमोर 'विराट' आव्हान; 353 धावांचे लक्ष्य

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019
लंडन:
 मिश्यांना तांव मारत शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले आणि भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352चे आव्हान उभारता आले. धवनने प्रथम रोहित शर्मासह शतकी आणि नंतर विराट कोहलीबरोबर 93 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी मोठी धावसंख्या उभारायला पाया ठरली.

रोहित शर्मा (57 धावा) आणि कर्णधार विराट कोहलीने (82 धावा) शिखर धवनच्या शतकाला योग्य साथ दिली. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या हार्दिक पंड्याने 27 चेंडूत 48 धावा काढून धावफलकाला दिलेली गती मोठे काम करून गेली.

प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षकांनी प्रेक्षागृह भरून टाकले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा विराट कोहलीचा निर्णय अपेक्षित होता. दोनही संघात कोणतेही बदल केले गेले नाहीत. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मापेक्षा आज शिखर धवन जोमात फलंदाजी करू लागला. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सचे चेंडू खेळपट्टीवरून उडत नव्हते. दोघा फलंदाजांनी एकदम समंजस सुरुवात करताना पळून धावा काढण्यावर भर दिला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळत नसल्याने मार्‍यातील प्रभाव कमी झाला. धवनने पकडलेली लय बघून रोहितने त्यालाच जास्त खेळायला संधी दिली. दोघांनी अगदी सहजी फटकेबाजी करून अर्धशतके करण्यासोबत भागीदारीचे शतक पूर्ण केले.    

कुल्टर नाईलचा काहीशा उडलेल्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाल्यावर विराट कोहली फलंदाजीला मैदानात आला. दोन दिल्लीकर फलंदाजांनी मग गोलंदाजांना मैदानाच्या चारही कोपर्‍यात पिटाळले. आयसीसीच्या स्पर्धेत नेहमी खास खेळी सादर करणार्‍या शिखर धवनने 95 चेंडूत शतक पूर्ण केले. अगोदरच्या सामन्यात प्रभाव पाडणारा अ‍ॅडम झँपाला भारतीय फलंदाजांनी चांगले चोपले. तसे बघायला गेले तर मॅक्सवेल, झंपा आणि स्टोयनिसच्या मिळून 20 षटकात फलंदाजांनी 157 धावा वसूल केल्या. 

117 धावांची जबरदस्त खेळी करून शिखर धवन बाद झाल्यावर संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंड्याला बढती दिली. अलेक्स केरीने शून्यावर पंड्याचा झेल सोडून पायावर धोंडा पाडून घेतला. हार्दिक पंड्याने गोलंदाजांवर कडाडून हल्ला चढवला. 3 उत्तुंग षटकारांसह हार्दिकने 27 चेंडूत 48 धावांची खेळी करून धावगती तुफान पळवली. पॅट कमिन्सचा फूल टॉस चेंडू मारताना बॅट हातात फिरल्याने पंड्या बाद झाला.

नंतर कोहलीने 82 धावा काढताना मारलेले ताकदवान फटके प्रेक्षकांना खूश करून गेले. 50 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारताच्या नावासमोर 5 बाद 352 चा धावफलक दिसत होता.

निळ्या रंगाने ओव्हल रंगले
रविवारी ओव्हल मैदानावरचे दृश्यं बघण्यासारखे होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याकरता खेळ चालू होण्याअगोदर दीड तास प्रेक्षकांनी मैदानावर गर्दी करायला सुरुवात केली. सांगून खोटे वाटेल पण मैदानाच्या आवारातील गर्दीतून फिरताना कानावर मराठी भाषा वारंवार पडत होती. सामना चालू होण्याअगोदर राष्ट्रगीताला 'जय हे जय हे'चा गजर झाला तो क्षण कमाल होता. सामना चालू झाल्यावर लक्षात आले की ओव्हल मैदानाचे प्रेक्षागृह निळ्या रंगाने रंगले होते इतक्या मोठ्या संख्येने भारतीय संघाचे पाठीराखे सामन्याचा आनंद घ्यायला हजर होते. 

loading image