भारतासमोर विंडीजचे 323 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
Sunday, 21 October 2018

 विंडीजने 50 षटकात 8 बाद 322 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने भारतापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले.

गुवाहाटी : कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या वेस्ट इंडीज संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत तीनशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवले. शिमरॉन हेटमेयरच्या शतकाने वेस्ट इंडीजला भारतापुढे मोठे आव्हान ठेवता आले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहंमद शमीने सलामीवीर हेमराजला 9 धावांवर बाद करत भारताला चांगली सुरवात करून दिली. पण पॉवेल आणि होप यांनी अर्धशतकी भागीदारी करत आश्वासक सुरवात केली. मात्र, विंडीजचे सलग दोन बाद झाल्याने त्यांची अवस्था 3 बाद 86 अशी झाली. 

त्यानंतर आलेल्या हेटमायरने आगोदर पॉवेलच्या साथीने आणि नंतर होल्डरच्या साथीने धावा जमाविण्यास सुरवात केली. त्याने काही आक्रमक फटकेही मारले. झटपट धावा जमावत हेटमायरने आपले शतक पूर्ण केले. अखेर 108 धावांवर जडेजाने त्याला बाद केले. त्याने 78 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारासह 106 धावांची खेळी केली. कर्णधार होल्डरनेही 38 धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. भारताकडून युझवेंद्र चहलने 3 आणि जडेजा व शमीने प्रत्येकी दोन बळी मिळविले.

अखेर, विंडीजने 50 षटकात 8 बाद 322 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने भारतापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India need 323 to win