esakal | भारताच्या दिवसभरात चारशे धावा
sakal

बोलून बातमी शोधा

India scored four hundred runs in the day

भारताच्या दिवसभरात चारशे धावा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हंबानटोटा (श्रीलंका) : भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघातील आघाडीच्या फळीतील अथर्व तायडे आणि पवन शहा यांनी झळकाविलेल्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंका 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसांच्या कसोटी सामन्यात एका दिवसात चारशे धावा फटकाविल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 4 बाद 428 धावा केल्या होत्या. 

पहिल्या कसोटीत 113 धावांची खेळी करणाऱ्या तायडेने दुसऱ्या कसोटीत 172 चेंडूंत 177 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने 20 चौकार आणि तीन षटकार ठोकले. भारतीय कर्णधार अनुज रावतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यावर दिवसभर भारतीय फलंदाजांचेच वर्चस्व राहिले. 

कर्णधार रावत (11) झटपट बाद झाल्यावर खेळायला आलेल्या पवनची अथर्वबरोबर जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 263 धावा जोडल्या. तायडे 58व्या षटकात बाद झाला. त्यानंतर पडिक्कल (6) लगेच बाद झाला. त्या वेळी पवनला पदार्पण करणाऱ्या आर्यन जुयल (41) याची साथ मिळाली. या जोडीने 76 धावांची भर घातली. 

अखेरच्या सत्रात जुयल बाद झाला. खेळ थांबला तेव्हा पवन 177 आणि नेहल वढेरा 5 धावांवर खेळत होता. पवनने आपल्या नाबाद खेळीत 19 चौकार लगावले. 
संक्षिप्त धावफलक : 
भारत 19 वर्षांखालील 4 बाद 428 (अथर्व तायडे 177, पवन शहा खेळत आहे 177, आर्यन जुयल 41, वियासकांथ 1-80)