कोहलीचा स्वप्नवत 'फॉर्म'; भारत 356/3

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

भारतीय कर्णधाराने त्याच्या सध्याच्या स्वप्नवत "फॉर्म'ला साजेशी फलंदाजी करत बांगलादेशी गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. कोहली व रहाणे यांनी धावांची गती घसरु न देण्याचीही खबरदारी घेत 122 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

हैदराबाद - बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने षटकामागे 3.95 धावांच्या सरासरीने दमदार फलंदाजी करत साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले. सलामीवीर मुरली विजय (108 धावा - 160 चेंडू) व कर्णधार विराट कोहली (नाबाद 111 धावा - 141 चेंडू) यांनी झळकाविलेली शतके भारताच्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. आज दिवस अखेर कोहली व अजिंक्‍य रहाणे (45 धावा - 60 चेंडू) ही जोडी खेळत आहे.

भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. बांगलादेशचा जलदगती गोलंदाज तक्‍सिन अहमद याने सलामीवीर लोकेश राहुल यास त्रिफळाबाद केले. लोकेश अवघ्या 2 धावा काढून तंबूत परतला; मात्र विजय व चेतेश्‍वर पुजारा (83 धावा - 177 चेंडू) यांनी दुसऱ्या बळीसाठी 178 धावांची भागीदारी करत भारताच्या डावाचा भक्कम पाया रचला. विजय याचे हे कारकिर्दीमधील नववे; तर या मोसमामधील तिसरे शतक आहे.

पुजारा याला मेहंदी हसन मिराझ या फिरकीपटूने बाद केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय कर्णधाराने त्याच्या सध्याच्या स्वप्नवत "फॉर्म'ला साजेशी फलंदाजी करत बांगलादेशी गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. कोहली व रहाणे यांनी धावांची गती घसरु न देण्याचीही खबरदारी घेत 122 धावांची अभेद्य भागीदारी रचली. या जोडीने अखेरच्या 10 षटकांत तब्बल 71 धावा जोडल्या. कोहली याच्या मुक्त फलंदाजीस कोणताही गोलंदाज प्रभावी अडथळा निर्माण करु शकला नाही.

बांगला क्षेत्ररक्षकांसाठी आजचा दिवस कठोर परीक्षा पाहणारा ठरला. 'स्लिप'जवळून गेलेल्या काही झेलांसहित 19 व्या षटकांत चालुन आलेली धावबाद करण्याची संधीही बांगलादेशने दवडली.

"याआधीच्या काही सामन्यांत झालेल्या फलंदाजीप्रमाणेच या सामन्यातही फलंदाजी करण्याचा माझा प्रयत्न होता. मी व पुजाराने मुलभूत बाबींवर भर देत शक्‍य तेव्हा एकेरी धावा काढण्यात यश मिळविले. पुजाराबरोबर फलंदाजी करणे मला नेहमीच आवडते. विराट यानेही उत्तम फलंदाजी केली. तो पुढेही अशीच फलंदाजी करेल, अशी आशा आहे,'' अशी प्रतिक्रिया विजय याने दिवस अखेर बोलताना व्यक्‍त केली.

Web Title: India scores 356/3 at end of the first day