भारताचा डावही 105 धावांत संपुष्टात;ऑस्ट्रेलिया 57/2

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

कफी याने नेमक्‍या टप्प्यावर केलेल्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क यानेही भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यासहित चेतेश्‍वर पुजारा यालाही तंबूत परत पाठवित महत्त्वपूर्ण योगदान दिले

पुणे - भारत व ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना आज (शुक्रवार) दुसऱ्याच दिवशी रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. काल (गुरुवार) अर्धशतक झळकावून नाबाद राहिलेल्या स्टार्क याला भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन आश्‍विन जडेजाकरवी झेलबाद केले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आज सकाळी 260 डावांत आटोपला. मात्र यानंतर फलंदाजीस सुरुवात केलेल्या भारताचा पहिला डावही अवघ्या 40 षटकांत संपुष्टात आला. भारताचा डाव 105 धावांत निकालात निघाल्यानंतर हाती आलेल्या अखेरच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावित 57 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख फिरकीपटू स्टीव्ह ओ कफी याने अवघ्या 35 धावांत मिळविलेले 6 बळी हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. कफी याने नेमक्‍या टप्प्यावर केलेल्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क यानेही भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यासहित चेतेश्‍वर पुजारा यालाही तंबूत परत पाठवित महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातर्फे सलामीवीर के एल राहुल याच्या अर्धशतकाचा (64 धावा - 97 चेंडू) अपवाद वगळता अन्य कोणी फलंदाज 15 धावाही काढू शकला नाही. अजिंक्‍य रहाणे याच्या 13 धावा या भारतीय डावातील द्वितीय सर्वोच्च क्रमाकांच्या धावा ठरल्या.

भारतीय डाव 105 धावांत संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियास 155 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. यानंतर पुढे खेळावयास सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. आश्‍विन याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (10 धावा - 6 चेंडू) व शॉन मार्श (0 धावा -21 चेंडू) यांना त्वरित तंबूत धाडत ऑस्ट्रेलियास धक्के दिले. सामन्याचा हा अवघा दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावास प्रारंभहे झाला आहे. यामुळे आता ऑऑस्ट्रेलियाकडून भारतासमोर किती धावांचे आव्हान ठेवले जाते, याची उत्सुकता आहे

Web Title: India shatters in 105; Australia 57/2