चँपियन्स करंडकासाठी युवराज, रोहित, धवन संघात

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी

नवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (आयसीसी) सुरू असलेल्या महसूल वाटपाच्या वादात एक पाऊल मागे घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय संघाच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहभागावर शिक्कामोर्तब केले होते. चॅंपियन्स स्पर्धेसाठी आज नवी दिल्लीत संघ निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली. सलामीवीर के. एल. राहुल याला दुखापतीमुळे संघातून वगळून शिखर धवनला पुन्हा संधी देण्यात आली. रोहित शर्मा, आश्विन आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. अष्टपैलू युवराजसिंगवर निवड समितीने विश्वास ठेवल्याचे दिसत आहे. 

फिरकीपटू कुलदीप यादव याच्या संघातील सहभागाबाबत चर्चा होती. मात्र, निवड समितीने आश्विनसह जडेजा हा एकमेव फिरकीपटू संघात ठेवला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी या चार जलदगती गोलंदाजांना इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचा अंदाज पाहून संघात निवडण्यात आले आहे. केदार जाधवला त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे संघात स्थान मिळाले आहे. 

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, की आम्ही संघ निवडीवेळी कुलदीप यादवच्या नावाची चर्चा केली. मात्र, तो थोडक्यात स्थान मिळवू शकला नाही. तो गुणवान खेळाडू आहे. रिषभ पंत, कुलदीप यादव, सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवले आहे. महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याचा विराटला निर्णय घेतानाही फायदा होणार आहे. आश्विनची निवडही आमच्यासाठी अवघड नव्हती. तो चँपियन्स करंडकासाठी सराव करत होता.

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी

गट अ - ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड
गट ब - भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका

स्पर्धेचे वेळापत्रक -
इंग्लंड वि. बांगलादेश - 1 जून, द ओव्हल (दुपारी 3)
ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड - 2 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)
श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका - 3 जून, द ओव्हल (दुपारी 3)
भारत वि. पाकिस्तान - 4 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)
ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश - 5 जून, द ओव्हल (सायंकाळी 6)
न्यूझीलंड वि. इंग्लंड - 6 जून, कार्डीफ (दुपारी 3)
पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका - 7 जून, एजबॅस्टन (सायंकाळी 6)
भारत वि. श्रीलंका - 8 जून, द ओव्हल (दुपारी 3)
न्यूझीलंड वि. बांगलादेश - 9 जून, कार्डीफ (दुपारी 3)
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया - 10 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)
भारत वि. दक्षिण आफ्रिका - 11 जून, द ओव्हल (दुपारी 3)
श्रीलंका वि. पाकिस्तान - 12 जून, कार्डीफ (दुपारी 3)
पहिला उपांत्य सामना - 14 जून, कार्डीफ (दुपारी 3)
दुसरा उपांत्य सामना - 15 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)
अंतिम सामना - 18 जून, द ओव्हल (दुपारी 3)

आतापर्यंतचे विजेते -
1998 - दक्षिण आफ्रिका
2000 - न्यूझीलंड
2002 - भारत व श्रीलंका विभागून
2004 - वेस्ट इंडीज
2006 - ऑस्ट्रेलिया
2009 - ऑस्ट्रेलिया
2013 - भारत

Web Title: India squad announced for Champions Trophy 2017