INDvsWI : थांबा थांबा, उद्या संघनिवड होणारच नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे उपांत्य फेरीत संपुष्टात आलेले आव्हान, मधल्या फळीतील संघ निवड, त्यातच धोनीला निवृत्तीचे सर्वत्र देण्यात येणारे सल्ले यामुळे भारतीय क्रिकेट क्षेत्र ढवळून निघत असताना बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रसासकीय समिती यांच्यामध्येही शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.

मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली तरी उद्या (शुक्रवार) ही बैठक होण्याची चर्चा रंगली होती. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे उपांत्य फेरीत संपुष्टात आलेले आव्हान, मधल्या फळीतील संघ निवड, त्यातच धोनीला निवृत्तीचे सर्वत्र देण्यात येणारे सल्ले यामुळे भारतीय क्रिकेट क्षेत्र ढवळून निघत असताना बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रसासकीय समिती यांच्यामध्येही शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. 

आत्तापर्यंत निवड समितीची बैठक बोलवण्याचे अधिकार बीसीसीआयच्या सचिवांना होते, परंतु लोढा समितीच्या शिफारशीनुसार विनोद राय यांच्या प्रशासकीय समितीने त्यात बदल केला आणि दौऱ्यासाठी हे अधिकार निवड समितीच्या अध्यक्षांना दिले. तर परदेश दौऱ्यासाठी हे निवड समितीचे अध्यक्ष किंवा प्रशासकीय व्यवस्थापकांना दिले त्यामुळे बीसीसीआयचे सचिव यापुढे निवड समितीच्या बैठकीस उपस्थित राहू शकत नाही आणि त्यांच्या मंजूरीचीही गरज राहिलेली नाही. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्याची निवड कधी होणार हे अजून निश्‍चित करण्यात आलेले नाही. 

संघ निवडीला मान्यता देणे तसेच बदली खेळाडूबाबतही हिरवा कंदील दाखवण्यासाठी आता बीसीसीआयचे सचिव किंवा सीईओ यांची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
22 ऑक्‍टोबर रोजी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होणार आहे त्या अगोदर लोढा समितीच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रसासकीय समितीने जोर लावला असल्याचे बोलले जात आहे. 

खेळाडूंबाबतही रहस्य 
मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीच्या संघ निवडवर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. महेंद्रसिंग धोनीला संधी मिळणार की त्याला वगळणार? झटपट क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट असे दोन वेगवेगळे कर्णधार नियुक्त करणार का? अशा प्रश्‍नांनी जोरदार चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. निवड समितीचे अघ्यक्ष प्रसाद यांना बैठक बोलण्याचे अधिकार देण्यात आले असले तरी ते सर्व बाबी तपासूनच पुढचे पाऊल टाकत असतील त्यामुळे बैठकीची तारीक निश्‍चित करण्यात आली नसावी अशी चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India squad selection meeting for West Indies tour postponed