श्रीलंकेतील पुनरावृत्तीसाठी भारतीय उत्सुक

वृत्तसंस्था
Thursday, 16 November 2017

कोहली, रहाणेखेरीज भारताकडे चेतेश्‍वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, वृद्धिमान साह अशी फलंदाजीची, तर अश्‍विन, जडेजा ही फिरकी जोडी अशी ताकद आहे. विशेष म्हणजे अश्‍विन, जडेजा यांच्यात मोठी खेळी करण्याची देखील क्षमता आहे. खेळपट्टीचे स्वरूप बघूनच वेगवान गोलंदाजाची निवड केली जाईल. त्यासाठी भुवनेश्‍वर, महंमद शमी, इशांत शर्मा असे पर्याय भारतासमोर आहेत. 

कोलकता : दीड महिन्यापूर्वी भारताने श्रीलंका दौऱ्यात क्रिकेटच्या तीनही प्रकारात श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व राखले होते. मालिकेतील प्रत्येक सामना त्यांनी जिंकला होता. आता घरच्या मैदानावर त्यांच्याच विरुद्ध उतरताना त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू होत आहे. 

भारतीय संघाला अलीकडे विजयाची जणू सवय झाली आहे. आधी श्रीलंका नंतर ऑस्ट्रेलिया आणि मग न्यूझीलंड यांच्यावर विजय मिळवून भारतीय संघ यशाच्या लाटेवर आरूढ आहे. श्रीलंकेने भारताविरुद्धच्या अपयशानंतर पाकिस्तानवर कसोटी मालिकेत विजय मिळविला आहे. त्यानंतरही भारतीय संघाचेच पारडे जड राहणार यात शंका नाही. 

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाला कसोटी क्रिकेट सामन्यात आपल्या कामगिरीचे परीक्षण करण्याची ही चांगली संधी या निमित्ताने मिळणार आहे. कसोटी क्रिकेटचा विचार करता कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या फलंदाजीबाबत कमालीचे औत्सुक्‍य असेल. कोहलीने बांगलादेशाविरुद्ध या मोसमात 204, तर रहाणेने इंदूरला न्यूझीलंडविरुद्ध 188 धावांची खेळी केली होती. अर्थात, कोहलीला त्यानंतर कसोटी क्रिकेटच्या पाच डावांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. रहाणेदेखील चांगल्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकलेला नाही. त्यामुळेच या दोघांच्या कामगिरीकडे चाहत्यांसह टीकाकारांचे बारीक लक्ष राहणार आहे. प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाज रंगना हेराथचा सामना करण्यासाठी दोघांनी नेटमध्ये कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कसून सराव केला आहे. 

कोहली, रहाणेखेरीज भारताकडे चेतेश्‍वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, वृद्धिमान साह अशी फलंदाजीची, तर अश्‍विन, जडेजा ही फिरकी जोडी अशी ताकद आहे. विशेष म्हणजे अश्‍विन, जडेजा यांच्यात मोठी खेळी करण्याची देखील क्षमता आहे. खेळपट्टीचे स्वरूप बघूनच वेगवान गोलंदाजाची निवड केली जाईल. त्यासाठी भुवनेश्‍वर, महंमद शमी, इशांत शर्मा असे पर्याय भारतासमोर आहेत. 

दुसरीकडे श्रीलंका संघात एंजेलो मॅथ्यूज हा एकमेव भारतीय खेळपट्टीचा अनुभव असलेला खेळाडू आहे. त्याचा अनुभव हीच सध्या त्यांची ताकद मानली जात आहे. खेळपट्ट्यांचे स्वरूप बघता रंगना हेराथवर श्रीलंका संघ प्रामुख्याने अवलंबून राहील. सराव सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी आपल्या बॅट निश्‍चित परजून घेतल्या आहेत. दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रम हे त्यांचे सलामीचे फलंदाज फॉर्मात आहेत. कर्णधार चंडिमल, लाहिरू थिरीमन्ने, निरोशान डिकवेला, यांची त्यांना साथ मिळाले. 
खेळपट्टीचे एकूण स्वरूप लक्षात घेता दोन्ही संघाचा भर मंदगती गोलंदाजीवर अधिक असेल असेच वातावरण आहे. त्यातही भारतात पाऊल ठेवतानाच श्रीलंका कर्णधार चंडिमल याने चार गोलंदाज खेळविण्याचे सूतोवाच केले होते. ते कितपत योग्य होते, ते उद्याच अंतिम संघ निवडल्यानंतर समजून येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India, Sri Lanka test series starts in Kolkata