भारताचा विंडीजला व्हाईटवॉश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 November 2018

अखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय
चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी ते आव्हानही खुजे ठरवले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यातही विजय मिळविताना विंडीजचा सहा गडी राखून पराभव केला. 

अखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय
चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी ते आव्हानही खुजे ठरवले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यातही विजय मिळविताना विंडीजचा सहा गडी राखून पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने २० षटकांत ३ बाद १८१ धावा केल्या. धवन आणि पंतच्या फटकेबाजीनंतरही भारतालादेखील विजयासाठी अखेरच्या चेंडूची वाट पाहावी लागली. भारताने ४ बाद १८२ धावा केल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल झटपट बाद झाल्यावर या वेळी शिखर धवनने विंडीज गोलंदाजांना आपल्या बॅटचे पाणी दाखवले. त्याचवेळी पंतनेही आपली बॅट सरसावून विंडीज गोलंदाजीतील हवा काढून घेतली. 

तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी करताना या जोडीने भारताचा विजय शक्‍य केला. मात्र, विजयासाठी ७ धावांची गरज असताना भारताने विजय शक्‍य करणाऱ्या पंत आणि धवनला गमावले. पंतने ३८ चेंडूंत ५८, तर धवनने ६२ चेंडूंत ९२ धावा केल्या. विजयासाठी एका धावेची गरज असताना धवन बाद झाला. तेव्हा अखेरच्या चेंडूवर मनीष पांडेने चोरटी धाव घेत भारताचा विजय साकारला.

वेगवान सुरवातीनंतर अडखळलेल्या विंडीजच्या डावाला निकोलसच्या खेळीने आकार आला. भुवनेश्‍वर आणि युजवेंद्रच्या गोलंदाजीचा समाचार घेताना निकोलने केलेले फटक्‍यांचे इंप्रोव्हायजेशन लक्षवेधी ठरले. ब्राव्होनेदेखील त्याला सुरेख साथ दिली. अठरावे षटक अचूक टाकणाऱ्या खलिलला अखेरच्या षटकात मात्र निकोलसच्या इंप्रोव्हायजेशनचा प्रसाद मिळाला. 

या जोडीने अवघ्या ४३ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी करताना विंडीजचे आव्हान भक्कम केले. पूरनच्या नाबाद अर्धशतकी खेळीला ब्राव्होच्या ३७ चेंडूंतील ४३ धावांची साथ मिळाली. भारतीय गोलंदाजांनी तब्बल १० वाइड चेंडू टाकून विंडीजच्या धावसंख्येस पाठबळच दिले.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज २० षटकांत ३ बाद १८१ (पूरन ५३ २५ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, ब्राव्हो नाबाद ४३ -३७ चेंडू, २ चौकार, २ षटकार, हेटमेयर २६, होप २४, चहल २-२८) पराभूत वि. भारत २० षटकांत ४ बाद १८२ (शिखर ९२ -६२ चेंडू, १० चौकार, २ षटकार, पंत ५८ -३८ चेंडू ५ चौकार, ३ षटकार, पॉल २-३२)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India T-20 Series win