भारताला बांगलादेशविरुद्ध विजयाची संधी

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

लंचला खेळ थांबला तेव्हा भारताच्या बिनबाद 1 धावा झाल्या होत्या. भारताकडे 300 धावांची आघाडी होती. लंचनंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजीवर जोर देण्याचा निर्णय घेतला. मुरली विजय, राहुल लवकर बाद झाल्यानंतर पुजारा आणि विराटने झटपट धावा केल्या.

हैदराबाद - बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी निर्माण झाली असून, भारताला अखेरच्या दिवशी सात बळी मिळविण्याची गरज आहे. भारताने ठेवलेल्या 459 धावांच्या आव्हानासमोर बांगलादेशची आज (रविवार) चौथ्या दिवसअखेर 3 बाद 103 अशी अवस्था झाली आहे.

भारतीय गोलंदाजांना अनपेक्षित प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव संपुष्टात आणण्यात आज (रविवार) चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना यश आले. बांगलादेशचा पहिला डाव 388 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताने फॉलोऑन न देता फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले.

बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमचे शतक हे आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. रहिमने 127 धावांची खेळी केली. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी मिळविले. तर, आश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. आजच्य् दिवसातील पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने मेहदी हसनला त्रिफळाबाद करून भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर रहिमने तळाच्या फलंदाजांबरोबर छोट्या-छोट्या भागीदारी करत आपले शतक पूर्ण केले. अखेर आश्विनने रहिमला 127 धावांवर बाद करत बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला.

लंचला खेळ थांबला तेव्हा भारताच्या बिनबाद 1 धावा झाल्या होत्या. भारताकडे 300 धावांची आघाडी होती. लंचनंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजीवर जोर देण्याचा निर्णय घेतला. मुरली विजय, राहुल लवकर बाद झाल्यानंतर पुजारा आणि विराटने झटपट धावा केल्या. पुजाराने आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. अखेर भारताने चहापानाला खेळ थांबला तेव्हा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताने तोपर्यंत 4 बाद 159 धावा केल्या होत्या. 

भारताने दिलेल्या 459 धावांच्या आव्हानासमोर बांगलादेशची सुरवात खराब झाली. तमीम इक्बाल अवघ्या 3 धावांवर आश्विनचा शिकार ठरला. सौम्या सरकार आणि मोमीनूल हक यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण, सरकारला जडेजाने स्लीपमध्ये झेलबाद केले. मोमीनूलाही आश्विनने बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. दिवसअखेर शाकिब आणि मेहमुदुल्लाह खेळत होते.

Web Title: India take 299 lead after Mushfiqur ton