इंग्लंडमधील "कसोटीस' आजपासून सुरवात 

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

सर्वोत्तम क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडला रोखण्याचे आमच्यासमोर आव्हान नसून, ती संधी आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यांनी चांगला सराव झाला आहे. घरच्या मैदानावर खेळणार असल्याने इंग्लंडवर दडपण राहील. आम्ही मात्र एकदम बिनधास्त क्रिकेट खेळणार आहोत, असेही कोहली म्हणाला. 

मॅंचेस्टर - इंग्लंडमधील क्रिकेटच्या कसोटीस उतरण्यासाठी भारतीय संघाच्या प्रयत्नास उद्यापासून सुरवात होईल. या दोन संघांदरम्यान उद्या पहिला टी-20 सामना होईल, तेव्हा भारतीय संघ नक्कीच या दौऱ्याची यशस्वी सुरवात करण्यासाठी उत्सुक असेल. 

भारतीय संघ तीन टी-20, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने असे भरगच्च क्रिकेट या दौऱ्यात खेळणार आहे.

भारतीय संघ येथील हवमानाशी जुळवून घेण्यासाठी लवकर येथे आला आहे; तसेच या सामन्यापूर्वी ते आयर्लंडविरुद्ध दोन सामनेदेखील खेळले आहेत. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आता खेळाडूंची ताकद ओळखून आहे. या दोन सामन्यांनंतर तरी भारतीय संघ मधल्या फळीत स्थिरता शोधताना दिसतोय असे वाटते. सुरेश रैना अत्यंत उपयुक्त खेळाडू असला तरी निव्वळ फलंदाज म्हणून लोकेश राहुलवर भरवसा ठेवला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने भुवनेश्‍वर कुमारसोबत उमेश यादवला पसंती दिली जाईल. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची यशस्वी जोडी इंग्लंडमध्ये कशी कामगिरी करते हे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंडची मदार "थ्री जें'वर म्हणडे जेसन रॉय, जोस बटलर आणि जॉर्न बेअरस्टॉ यांच्यावर असेल. 

मँचेस्टरमध्ये गेले काही दिवस कडक ऊन पडले असल्यामुळे खेळपट्टी संपूर्ण सुकलेली आणि फलंदाजीला पोषक असेल असे दिसते. हा सामना संध्याकाळी होत असल्यामुळे त्याच वेळेस होणाऱ्या इंग्लंडच्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील कोलंबियाविरुद्धच्या लढतीकडे लंडनवासियांचे डोळे असणार आहेत. त्यामुळे या सामन्यास प्रेक्षकांच्या उपस्थितीविषयी शंका घेतली जात आहे. 

बेधडक क्रिकेट खेळणार - कोहली
सर्वोत्तम क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडला रोखण्याचे आमच्यासमोर आव्हान नसून, ती संधी आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यांनी चांगला सराव झाला आहे. घरच्या मैदानावर खेळणार असल्याने इंग्लंडवर दडपण राहील. आम्ही मात्र एकदम बिनधास्त क्रिकेट खेळणार आहोत, असेही कोहली म्हणाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India tour of England starts today