माइंड गेमनंतर मैदानावरची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई : शेरेबाजी (स्लेजिंग)संदर्भात माइंड गेम खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेच्या तयारीस उद्यापासून (ता. 17) सुरवात करत आहे. भारत अ संघाबरोबरच्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात त्यांचे लक्ष फिरकीचा सराव करण्यावरच अधिक असेल. दुसरीकडे भारत अ संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या अष्टपैलुत्व सिद्ध करण्यास उत्सुक असेल. 

मुंबई : शेरेबाजी (स्लेजिंग)संदर्भात माइंड गेम खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेच्या तयारीस उद्यापासून (ता. 17) सुरवात करत आहे. भारत अ संघाबरोबरच्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात त्यांचे लक्ष फिरकीचा सराव करण्यावरच अधिक असेल. दुसरीकडे भारत अ संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या अष्टपैलुत्व सिद्ध करण्यास उत्सुक असेल. 

चार कसोटी सामन्यांसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा एकमेव सराव सामना आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाला फिरकीचे आव्हान असेल याची त्यांना जाणीव असेलच; परंतु या सराव सामन्यासाठी कुलदीप यादव, शहाबाज नदीम या दुसऱ्या फळीच्या फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कशी फलंदाजी करतात, यावर मुख्य भारतीय संघाची कसोटी सामन्यासाठी रणनीती ठरू शकते. 

निवड समितीचे सर्व सदस्य या सामन्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे मुंबईत नसले तरी, त्यांचे लक्ष या सामन्यावर असेल. पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झालेला असला तरी, या सामन्यातील भारतीयांच्या कामगिरीची दखल निवड समिती घेईल. यंदाच्या रणजी मोसमात सर्वाधिक धावा करणारा प्रियांक पांचाळ, गत रणजी स्पर्धा गाजवणारा मुंबईचा श्रेयस अय्यर यांच्यासह रिषभ पंत आणि ईशांत किशान या नवोदितांना आपली गुणवत्ता दाखवण्याची ही चांगली संधी आहे. पांचाळने तर बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात शतक करून एक पाऊल पुढे टाकले आहे. 

कसोटी मालिकेपूर्वी एकमेव सराव सामना असल्यामुळे ऑस्ट्रेलियाही प्रमुख खेळाडूंना स्थान देईल. कर्णधार स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, थन लायन हे भारतात अगोदर खेळलेले आहेत. ग्लेन मॅक्‍सवेल, मिशेल मार्श, शॉन मार्श, मिशेल स्टार्क यांच्यासारख्या खेळाडूंकडे आयपीएलमुळे भारतात खेळण्याचा अनुभव आहे; तर जॅकसन बर्ड, पीटर हॅंड्‌सकॉम्ब, मॅथ्यू रेनशॉ असे खेळाडू भारतात प्रथमच खेळणार आहेत. भारतीयांनाही त्यांची फारशी माहिती नसल्यामुळे या सराव सामन्यातून त्यांची क्षमता आणि मानसिकता कुंबळे आणि कंपनीला जोखता येईल. 

या सराव सामन्यातून आम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे. कसोटी सामना असो वा सराव सामना, आम्ही त्याकडे गांभीर्यानेच पाहतो. 
- डॅरेन लिहमन, ऑस्ट्रेलिया प्रशिक्षक 

Web Title: India versus Australia cricket Virat Kohli Steve Smith