नायरऐवजी रहाणेला पसंती 

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

यातून निवडणार संघ 
भारत :
 विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, करुण नायर, अजिंक्‍य रहाणे, वृद्धिमन साहा, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पंड्या, अभिनव मुकुंद व कुलदीप यादव. 

बांगलादेश : मुशफिकूर रहीम (कर्णधार), तमिम इक्‍बाल, सौम्या सरकार, महमदुल्ला, मोईनुल हक, शब्बीर रेहमान, शकिब अल हसन, लिटॉन दास, तस्किन अहमद, मेहदी हसन मिराझ, मुसादिक हुसैन, कामरुल इस्लाम, सुभासिस रॉय, तईजुल इस्लाम व सैफुल इस्लाम.

हैदराबाद : एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आणि त्याच्याऐवजी संधी मिळालेल्या खेळाडूने चांगली कामगिरी केली असली, तरी तंदुरुस्त झालेल्या खेळाडूला पुन्हा त्याची जागा मिळते. या न्यायानुसार पार्थिव पटेलऐवजी वृद्धिमान साहाने पुनरागमन केले. करुण नायरने त्रिशतक केले, तरी आता असाच न्याय अजिंक्‍य रहाणेलाही मिळणार आहे.

बांगलादेशविरुद्ध उद्या (ता. 9) पासून सुरू होणाऱ्या कसोटीत रहाणे अंतिम संघात खेळणार असल्याचे सूतोवाच कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी केले आहे. 

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू होणारा बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना जिंकून विजयी मालिका कायम ठेवण्याबरोबर भारताला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी लय मिळवायची आहे. विराट सेनाविरुद्ध बांगलादेश हा सामना कागदावर तरी असमान असा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाला नवव्या स्थानी असलेल्या बांगलादेशशी सामना करायचा आहे. असे असले तरी भारताला वर्चस्व सिद्ध करणारी कामगिरी प्रत्यक्ष मैदानावर करावी लागणार आहे. 

बांगलादेशसाठी हा सामना ऐतिहासिक असेल. कसोटी दर्जा मिळाल्यानंतर ते प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार आहेत. भारतीय संघाला गेल्या आठपैकी सात सामन्यांत मिळालेल्या विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी झुंज द्यायची आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांसाठी भारतात येणार असल्यामुळे त्यांचेही लक्ष या सामन्यातील भारतीयांच्या कामगिरीवर असेल. 

इंग्लंडविरुद्धच्या मुंबईतील कसोटीच्या आदल्या दिवशी सराव करताना रहाणेच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दोन सामने खेळू शकला नव्हता आणि त्याच्याऐवजी संधी मिळालेल्या नायरने त्रिशतक करून आपली निवड सार्थ ठरवली होती. विराटने आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रहाणेला अंतिम संघासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. त्यामुळे नायरला राखीव खेळाडूंत राहावे लागण्याची शक्‍यता आहे. भारतीय संघ पाच फलंदाज, एक यष्टिरक्षक व पाच गोलंदाज अशा रचनेनुसार खेळत आहे. त्यामुळे अतिरिक्त फलंदाजासाठी (नायर) पाच गोलंदाजांची रचना बदलली जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. 

रहाणे, साहाची कसोटी 
नायरऐवजी रहाणे व पार्थिवऐवजी साहा, असे दोन बदल उद्या भारतीय संघात होतील; परंतु आता पर्याय उभे राहिलेले असल्यामुळे साहा आणि रहाणे यांना प्रभाव पाडावा लागणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींत रहाणे अपयशी ठरला होता, तर न्यूझीलंडविरुद्ध दुखापत होण्यापूर्वी साहाला लौकिकाप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. 

खेळपट्टी पारंपरिक 
राजीव गांधी स्टेडियमची भारतीय पद्धतीची पारंपरिक खेळपट्टी आहे. पहिल्या तीन दिवसांत फलंदाजीस उपयुक्त असेल, तर पुढचे दोन दिवस फिरकीस साथ मिळण्याची शक्‍यता आहे. बांगलादेशकडेही चांगले फिरकी गोलंदाज असल्यामुळे भारतीय फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मेहदी हसन मिराझ या नवोदित गोलंदाजाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. 

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून. 
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस.

Web Title: India versus Bangladesh Karun Nair Ajinkya Rahane Virat Kohli Hyderabad