खेळपट्टीनेच टाकला ‘गुगली’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

रांची - तिसरा कसोटी सामना सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत रांची खेळपट्टीचे स्वरूप कधीच उमगले नाही. अखेरच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टीचा स्वभाव बदलला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळण्याचे भारतीय संघाचे स्वप्न हवेतच विरून गेले. शॉन मार्श आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांनी ६२ षटके टिच्चून फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा गृहीत धरलेला पराभव टाळला. दोघांनी जिगरबाद खेळी करताना अर्धशतके झळकाविली. त्यामुळे तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आणि मालिकेतील १-१ ही स्थिती कायम राहिली.

रांची - तिसरा कसोटी सामना सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत रांची खेळपट्टीचे स्वरूप कधीच उमगले नाही. अखेरच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टीचा स्वभाव बदलला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळण्याचे भारतीय संघाचे स्वप्न हवेतच विरून गेले. शॉन मार्श आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांनी ६२ षटके टिच्चून फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा गृहीत धरलेला पराभव टाळला. दोघांनी जिगरबाद खेळी करताना अर्धशतके झळकाविली. त्यामुळे तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आणि मालिकेतील १-१ ही स्थिती कायम राहिली.

रांचीच्या खेळपट्टीने सामन्याच्या पाचव्या दिवशीही फलंदाजांना कडेवर घेतले. शंभर षटकांनंतर खेळ थांबविण्याचा निर्णय झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाने ६ बाद २०४ धावांची मजल मारली होती. रांचीच्या काळ्या मातीच्या खेळपट्टीने या कसोटीत गोलंदाजांचा घाम काढला. फलंदाजांना बाद करण्यासाठी गोलंदाजांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. द्विशतकी खेळी करणारा चेतेश्‍वर पुजारा सामन्याचा मानकरी ठरला. 

चौथ्या दिवशी पॅव्हेलियनच्या बाजूने तयार झालेल्या पॅचचा जडेजाने उठवलेला फायदा बघितल्यावर पाचव्या दिवशी खेळायला सुरवात झाली, तेव्हा भारतीय संघ विजयाला कशी आणि केव्हा गवसणी घालणार, याचेच औत्सुक्‍य अधिक होते. रेनशॉ या कालच्या नाबाद फलंदाजाबरोबर कर्णधार स्मिथ जोडीने पहिला तासभर सहज खेळून काढला. वेळ जाऊ लागला, तसे अंदाज बदलू लागले होते; पण ईशांतच्या पुढ्यात पडलेल्या चेंडूवर रेनशॉ पायचित झाला. जडेजाच्या चेंडूचा अंदाज वॉर्नरप्रमाणे स्मिथलाही आला नाही. लेग स्टंपवर पडलेला चेंडू वळणार या अंदाजने स्मिथने तो सोडून दिला आणि तो वळलाच नाही. चेंडूने सरळ उजवी यष्टी वाकवली. दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर भारतीयांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. 

पॅव्हेलियनच्या बाजूला काही जागी माती उकरली गेली होती. हा अपवाद सोडता रांचीची खेळपट्टी फलंदाजीलाच साथ देणारी राहिली. रवींद्र जडेजाचा चेंडू जरा जादू करत होता; पण पॅडचा अचूक उपयोग करून मार्श-हॅंडसकोम्ब जोडीने त्याला निराश केले. उमेश यादव आणि ईशांत शर्माचाही कोहलीने वापर करून बघितला. त्याचाही फायदा झाला नाही. दोघांनीही कमालीच्या संयमाने फलंदाजी केली. त्यांच्या बचावाच्या तंत्राला दाद द्यायलाच हवी. चहापानाला शॉन मार्श - हॅडसकोम्बची जोडी नाबाद परतली तेव्हाच सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकला होता. 

अनिवार्य षटकांचा खेळ सुरू झाल्यावर भारताला ही जोडी फोडण्यात यश आले. जडेजाने प्रथम मार्शला बाद केले. नंतर पहिल्या डावातील शतकवीर मॅक्‍सवेलची विकेट अश्‍विनने मिळवली. दोन्ही झेल विजयने टिपले. सामना अखेर अनिर्णित राहिला. कोहलीने सामन्यावर वर्चस्व कोणाचे, हे ठसवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अखेरपर्यंत खेळवले.

पाचवा दिवस
 मालिकेतील सर्वाधिक भागीदारी या कसोटीत. पुजारा-साहा (सातव्या विकेटसाठी १९९), हॅंड्‌सकोम-मार्श (पाचव्या विकेटसाठी १२४), मॅक्‍सवेल-स्मिथ (पाचव्या विकेटसाठी १९१), पुजारा-विजय (दुसऱ्या विकेटसाठी १०२)

 सलग ३८ डावांनंतर ऑस्ट्रेलियासाठी पाचव्या विकेटसाठी दोन्ही डावांत शतकी भागीदारी. 

 २००८नंतर दीडशे धावांची पिछाडी सहन करून एखाद्या परदेशी संघाने भारताविरुद्ध सामना अनिर्णित राखला. यापूर्वी २००७-०८ मध्ये पाकिस्तानने १६० धावांची पिछाडी सहन करून कोलकता कसोटी अनिर्णित राखली होती.

 भारताविरुद्ध दीडशे धावांनी पिछाडीवर राहिल्यानंतर सामना अनिर्णित राखण्याची ऑस्ट्रेलियाची तिसरी वेळ, यापूर्वी १९७९-८० मध्ये दिल्ली आणि १९८६-८७ मध्ये मुंबईत अशी कामगिरी.

 अखेरचा दिवस खेळून पाहुण्या संघाने सामना अनिर्णित राखण्याची सातवी घटना. यापूर्वी २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेची चेन्नई कसोटीत अशी कामगिरी.

 २००४ नंतर ऑस्ट्रेलिया संघाने प्रथमच भारतात दुसऱ्या डावात शंभरहून अधिक षटके तग धरला. यापूर्वी अशी कामगिरी चेन्नईत. त्या वेळी १३३.५ षटकांचा सामना.

 २०१६-१७च्या मोसमात अश्‍विनच्या ७८ विकेट्‌स. डेल स्टेनच्या २००७-०८ मधील कामगिरीशी बरोबरी.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४५१, भारत पहिला डाव ९ बाद ६०३ घोषित, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव २ बाद २३ वरून पुढे चालू...

मॅट रेनशॉ पायचीत गो. शर्मा १५, स्टिव्ह स्मिथ त्रि. गो. जडेजा २१, शॉन मार्श झे. विजय गो. जडेजा ५३ -१९७ चेंडू, ७ चौकार, पीटर हॅंड्‌सकोम्ब नाबाद ७२ -२०० चेंडू, ७ चौकार, ग्लेन मॅक्‍सवेल झे. विजय गो. आश्‍विन २, मॅथ्यू वेड नाबाद ९, अवांतर १६, एकूण १०० षटकांत ६ बाद २०४
गडी बाद क्रम - ३-५९, ४-६३, ५-१८७, ६-१९०
गोलंदाजी - आर. आश्‍विन ३०-१०-७१-१, रवींद्र जडेजा ४४-१८-५४-४, उमेश यादव १५-२-३६-०, इशांत शर्मा ११-०-३०-१
सामन्याचा मानकरी - चेतेश्‍वर पुजारा

Web Title: india vs australia third test match