दृष्टिक्षेपात चौथा दिवस : विजयाची औपचारिकता आवाक्‍यात

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

हैदराबाद : भारतात पहिलीच कसोटी खेळणारा बांगलादेश मायदेशात एकतर्फी वर्चस्व राखणाऱ्या कोहली सेनेला धक्काच देत आहे. काही महिन्यांपासून चौथ्या दिवशी विजय स्पष्ट करण्याची सवय लागलेल्या भारतीय संघास बांगलादेशने पाचव्या दिवसापर्यंत नेले आहे. पहिल्या डावातील त्रिशतकी आघाडीनंतर भारताने फॉलोऑन टाळला; पण बांगलादेशसमोर 458 धावांचे अवघड लक्ष्य ठेवतानाच पाचव्या दिवशी विजयाची औपचारिकता पूर्ण होणार असल्याचे संकेत दिले.

पहिल्या तीन दिवसांत बारा फलंदाज बाद झाल्यावर चौथ्या दिवशी 11 फलंदाज बाद झाले. राजीव गांधी स्टेडियमवरील खेळपट्टीवर अजूनही फलंदाजी अशक्‍य नसल्यामुळे भारताने फॉलोऑन टाळला; पण त्याच वेळी आपल्या गोलंदाजांना बांगलादेशला बाद करण्यासाठी चार सत्रे कोहली ठेवणार हे स्पष्ट होते. कोहलीने बांगला फलंदाजांना सव्वाशे षटके खेळण्याचे आव्हान दिले. पहिल्या डावात बांगलादेशने त्यापेक्षा जास्त फलंदाजी केली आहे.

बांगलादेशचा डाव पहिल्या सत्रापेक्षा जास्त वेळ चालणार नाही, ही खबरदारी भारताच्या गोलंदाजांनी घेतली. अश्‍विनने अडीचशे विकेटचा टप्पा गाठतच हा डाव संपवला. हाच अश्‍विन दुसऱ्या डावात जास्त भेदक झाला. उजव्या यष्टीबाहेर तयार झालेल्या रफचा फायदा घेत बांगला फलंदाजांना सतावण्यास सुरवात केली आहे. त्याच्या जोडीला रवींद्र जडेजा आल्यावर बांगला फलंदाजांचे रूपांतर इंग्लंड, किवी फलंदाजात झाले. शकीब अल हसन आणि मोमीनुलने दिवसातील अखेरची 10.5 षटके किल्ला लढवला खरा; पण ही जोडी फुटल्यावर कसोटी किती चालेल, हा प्रश्‍नच आहे.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीयांचा सहज सामना केल्यामुळे रहीम आणि मेहेदी हसनचा आत्मविश्‍वास उंचावला होता; पण भुवनेश्‍वरने दिवसातील पहिल्याच षटकात चेंडू रिव्हर्स स्विंग करीत यश मिळवले. रहीम मैदानात असेपर्यंत बांगलादेश पिछाडीचे अंतर कमी करणार होते, त्यामुळेच भारताला अखेरचे चार फलंदाज बाद करण्यासाठी संपूर्ण सत्र लागले. रहीम साहाच्या चपळाईने बाद झाला आणि बांगला डाव संपला. रहीमचे शतक त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले.
भारतीयांनी दुसऱ्या डावात सुरवातीपासून आक्रमण केले. विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणेचा तडाखा अपेक्षित होता; पण चेतेश्‍वर पुजारानेही कसोटी कारकिर्दीतील आठवा षटकार मारला. भारतीयांनी षटकामागे पाचपेक्षा जास्त गतीने धावा केल्या. पुजाराला काही वेळ साथ दिलेल्या जडेजाने त्यानंतर अश्‍विनला गोलंदाजीत साथ दिली. आता अश्‍विन व जडेजावरच ही कसोटी किती लांबवायची, हेच ठरवतील.

- अश्‍विनचे कसोटी बळींचे अडीच शतक पूर्ण.
- ही कामगिरी विक्रमी 45 कसोटींत पूर्ण करताना डेनिस लीली (48) यांना मागे टाकले.
- अनिल कुंबळेंचा (55) भारतीय विक्रमही मोडीत. बिशन बेदी यांनी 60 व्या, हरभजनने 61 व्या, तर कपिलने 65 कसोटींत कामगिरी केली होती.
- 45 कसोटीतील सर्वाधिक 232 बळींचा विक्रम डेल स्टेनचा होता. मुथय्या मुरलीधरन (218) फिरकी गोलंदाजांत आघाडीवर होता.
- अश्‍विनच्या कसोटी पदार्पणापासून त्याचेच सर्वांत जास्त बळी. रंगना हेराथ (46 कसोटीत 247) दुसरा.
- अश्‍विन अडीचशे विकेट घेत असताना भारताच्या अन्य गोलंदाजांच्या निम्म्याही विकेट नाहीत. जडेजा 112 विकेटसह दुसरा.
- अश्‍विनने 5 वर्षे 95 दिवसांत अडीचशे बळी घेतले, तर ग्रॅमी स्वान याने ही कामगिरी 4 वर्षे 345 दिवस या कालावधीत केली आहे.
- भारताने बांगलादेशला सव्वाशे षटके खेळण्याचे आव्हान दिले आहे, भारतातील चौथ्या डावात परदेशी संघ सर्वांत जास्त 143.1 षटके खेळला आहे (दक्षिण आफ्रिका, दिल्ली - 2015, पराभव).
- बांगलादेशचा सर्वाधिक लांबलेला चौथा डाव 142 षटकांचा आहे (झिंबाब्वेविरुद्ध 2005).
- रहीमचे भारताविरुद्धचे दुसरे शतक. भारताविरुद्ध दोन शतके केलेला रहीम एकमेव बांगलादेश फलंदाज.
- रहीमचे सलग दुसऱ्या कसोटीत शतक, न्यूझीलंडविरुद्ध 159 धावांची खेळी.
- रहीमचे हे पाचवे कसोटी शतक, पाच शतके वेगवेगळ्या देशांत.
- बांगलादेशने प्रथमच भारताविरुद्धची कसोटी पाचव्या दिवशी नेली (पावसाचा व्यत्यय सोडल्यास).

Web Title: india vs bangladesh test match fourth day