कुलदीपचे सहा बळी; रोहितचे शतक; भारताचा दणदणीत विजय

Friday, 13 July 2018

नॉटिंगहॅम : ट्रेंट ब्रीजच्या उत्तम खेळपट्टीवर इंग्लंड संघाच्या बाळसे धरू बघणार्‍या धावसंख्येला भारतीय फिरकीने  ब्रेक्स लावले. चालू दौर्‍यातील कुलदीप यादवच्या फिरकीची दहशत कायम राहिली. कुलदीपने १० षटकात २५ धावा देत सहा इंग्लिश फलंदाजांना बाद करून दणकेबाज कामगिरी केली. इंग्लंडने उभारलेल्या २६८ धावांचा भारतीय फलंदाजांनी फक्त दोन विकेट गमावून ४१ व्या षटकात सहजी पाठलाग करत ट्रेंट ब्रीज मैदानावरचा पहिला एक दिवसीय सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने सलग दुसर्‍या सामन्यात शतक  (नाबाद १३७ धावा) झळकावून सातत्य दाखवले.

नॉटिंगहॅम : ट्रेंट ब्रीजच्या उत्तम खेळपट्टीवर इंग्लंड संघाच्या बाळसे धरू बघणार्‍या धावसंख्येला भारतीय फिरकीने  ब्रेक्स लावले. चालू दौर्‍यातील कुलदीप यादवच्या फिरकीची दहशत कायम राहिली. कुलदीपने १० षटकात २५ धावा देत सहा इंग्लिश फलंदाजांना बाद करून दणकेबाज कामगिरी केली. इंग्लंडने उभारलेल्या २६८ धावांचा भारतीय फलंदाजांनी फक्त दोन विकेट गमावून ४१ व्या षटकात सहजी पाठलाग करत ट्रेंट ब्रीज मैदानावरचा पहिला एक दिवसीय सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने सलग दुसर्‍या सामन्यात शतक  (नाबाद १३७ धावा) झळकावून सातत्य दाखवले. कोहलीसह ( ७५ धावा ) रोहित शर्माने मोठी शतकी भागीदारी रचून भारताचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी अर्थातच कुलदीप यादव ठरला.

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने नेहमीप्रमाणे धावांचा पाठलाग करायचा विचार कायम ठेवला.  खेळाच्या सुरुवातीला उमेश यादवने दोनही बाजूला चेंडू स्वींग करून फलंदाजांना प्रश्न विचारले. लवकरच जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने जम बसवला आणि टकाटक चौकार मारणे चालू केले. ७३ धावांची सलामी झाली म्हणल्यावर विराट कोहलीने हुकमी अस्त्र कुलदीप यादवला गोलंदाजीला आणले. 

कुलदीपला रिव्हर्स स्वीप मारताना जेसन रॉयने विकेट गमावली. ज्यो रुटला कुलदीपने भसकन वळणारा लेगस्पीन टाकून पायचित केले तर जम बसलेल्या बेअरस्टोला गुगली टाकून पायचित केले. कप्तान इयॉन मॉर्गन चहलला फसला तेव्हा त्याच्या नावासमोर १९ धावा लागलेल्या होत्या. संघाची गरज ओळखून बेन स्टोकस्ने एकदम स्वभावाविरुद्ध सावध फलंदाजी केली.

जोस बटलर आणि बेन स्टोकस्ने डगमगणारा डाव सावरला. सहजी अर्धशतक करणारा बटलर किंवा झगडून अर्धशतक करणारा बेन स्टोकस् असो, दोघेही धोकादायक ठरत असताना परत एकदा मदतीला कुलदीप धावून आला. कुलदीपने प्रथम बटलर आणि नंतर बेन स्टोकस्ला बाद केले. बेन स्टोकस्चा अफलातून झेल सिद्धार्थ कौलने पकडला. १० षटकात २५ धावा देत कुलदीपने ६ फलंदाजांना बाद करायचा पराक्रम केला होता. कोणाच डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाला एक दिवसीय सामन्यात ६ फलंदाजांना बाद करता आले नव्हते. तळातील फलंदाजांनी प्रयत्न करूनही इंग्लंडचा डाव  सर्वबाद २६८ धावांवर रोखला गेला. 

शिखर धवनने ८ चौकार मारून ४० धावा काढताना संघाला उत्तम सुरुवात करून दिली. मोईन अलीला उगाचच पुढे येऊन हवेत फटका मारायच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्यानंतर इनफॉर्म रोहित शर्माला कप्तान कोहली सामील झाला. दोघांनी मिळून गोलंदाजी सहजी हाताळत धावफलक पळवला. बहुतांशी षटकात दोघे एक तरी चौकार मारत राहिल्याने दडपण कधी वाढलेच नाही. पुढे पडलेल्या चेंडूला कडक ड्राईव्ह आणि आपटलेल्या चेंडूवर कधी पुलचा तर कधी नुसती बॅट तिरकी करत विकेट किपर शेजारून चौकार रोहित मारत होता. 

मोईन अलीला एक षटकार एक चौकार मारून रोहित नव्वदीत पोहोचला. आदील रशीदला उत्तुंग षटकार मारून रोहितने १८वे एक दिवसीय शतक झोकात साजरे केले. विजय जवळ आला असताना विराट ७५  धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलसह रोहितने गरजेच्या धावा काढून भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळवून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs England 1st ODI Nottingham