इंग्लंडवर आता अखेरचा हल्ला 

पीटीआय
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

चेन्नई - भारतीय उपखंडात तीन महिने मार खात असलेल्या इंग्लंड संघावर अखेरचा हल्ला करून त्यांना पुरते नामोहरम करण्याचा विराट सेनेचा इरादा असेल; पण घायाळ इंग्लंड संघ, चक्रीवादळास सामना केलेली खेळपट्टी याचे आव्हान भारतासमोर असेल. 

चेन्नई - भारतीय उपखंडात तीन महिने मार खात असलेल्या इंग्लंड संघावर अखेरचा हल्ला करून त्यांना पुरते नामोहरम करण्याचा विराट सेनेचा इरादा असेल; पण घायाळ इंग्लंड संघ, चक्रीवादळास सामना केलेली खेळपट्टी याचे आव्हान भारतासमोर असेल. 

इंग्लंड संघ ऑक्‍टोबरच्या सुरवातीपासून भारतीय उपखंडात आहे. बांगलादेशमधून हार स्वीकारलेल्या इंग्लंडला भारतात प्रतिस्पर्ध्यांना आव्हानही देता आले नाही. खरे तर अडीच महिन्यांत एकमेव विजय आणि चार पराभव अशी नामुष्की इंग्लंडवर ओढवली आहे. त्यातच संघ निवडण्याचे आव्हान प्रत्येक सामन्यागणिक अवघड होत आहे. 
हे सर्व प्रश्‍न कमीच की काय म्हणून जेम्स अँडरसन भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत खेळणार नाही. 

विराट सेना चांगलीच बहरात आहे. इंग्लंडची अवस्था सध्याच्या चेन्नईतील वातावरणासारखीच आहे. पराभवांच्या वादळाच्या जबर फटक्‍यातून सावरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; मात्र ही संधी त्यांना भारतीय संघ देण्याची शक्‍यता कमीच आहे. विराट कोहलीला कसे रोखायचे, हा प्रश्‍न जणू त्यांनी ऑप्शनला टाकला आहे, तर आर. अश्‍विनची जास्तीत जास्त षटके विकेटविनाच जाऊ देत, ही त्यांची प्रार्थना आहे. भारताच्या नवव्या क्रमांकावरील फलंदाजाने शतक केल्यावर इंग्लंड गोलंदाजांचे मनोधैर्य किती उच्च असेल, हा प्रश्‍नच आहे. घरच्या मालिकेत सर्वाधिक चार कसोटी जिंकण्याचा विक्रम भारतास खुणावत आहे. हा पराक्रम 2013 मध्ये झाला होता. ही कसोटी गमावली नाही तर भारत सलग 18 कसोटीत अपराजित राहील. हा 84 वर्षांच्या भारताच्या कसोटी इतिहासातील पराक्रमच असेल. 

झाडे पडतात; गवत नाही 
मोठमोठ्या वादळात झाडे पडतात, गवत नाही, हे उद्‌गार आहेत चेन्नईचे मैदान तयार करणाऱ्या ग्राउंडस्‌मनचे. चेन्नईतील ड्रेनेज यंत्रणा सर्वोत्तम आहे. त्यामुळे येथे पाणी साचले नाही. खेळपट्टी आच्छादित होती. त्यामुळे तिचेही जास्त नुकसान झाले नाही. प्रकाशझोत दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जणू काही या कसोटीद्वारे गेल्या काही दिवसांतील प्रतिकूल परिस्थिती संपणार आहे, अशीच भावना आहे. 

 

पाचवी कसोटी आजपासून

थेट प्रक्षेपण ः सकाळी 9.30 पासून स्टार स्पोर्टस्‌ 
खेळपट्टीचा अंदाज ः चक्रीवादळाचा सामना केलेली. कोळशाचा शेक दिलेल्या खेळपट्टीचा अंदाज काय व्यक्त करणार. जमिनीत ओलावा नक्कीच असणार. त्याचा फायदा सीम गोलंदाजीस होईल; पण त्याचवेळी अश्‍विनचे हे होम पीच आहे. पहिल्या काही षटकांकडे सर्वांचेच लक्ष असेल. 
हवामानाचा अंदाज ः पहिल्या दिवशी ढगाळ हवामान तसेच काही सरी. त्यानंतरचे दोन दिवस क्वचित ढगाळलेले. अखेरचे दोन दिवस प्रामुख्याने ढगाळलेले तसेच काही सरीही अपेक्षित. 
संघात बदल ः भारत ः शक्‍यता धूसरच. फार तर भुवनेश्‍वर की ईशांत शर्मा हाच विचार.

इंग्लंड ः डावखुरा फिरकी गोलंदाज लियाम डॉसन याचा समावेश नक्की. जेम्स अँडरसन नसणार तसेच कदाचित ख्रिस ब्रॉडही. ब्रॉड तंदुरुस्त ठरल्यास वोक्‍स संघाबाहेर. 

हे महत्त्वाचे 
- प्रतिस्पर्धी संघ प्रथमच कोणत्याही सरावाविना कसोटी खेळणार 
- इंग्लंडचा चेन्नईतील आठपैकी तीन कसोटींत विजय, तर चारमध्ये पराभव 
- भारताची येथील 31 पैकी 13 कसोटींत सरशी 
- कोहलीच्या चार कसोटींत 640 धावा, गावसकरचा मालिकेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी 135 धावांची गरज 
- अश्‍विनच्या मालिकेत 27 विकेट्‌स; चंद्रशेखर यांचा 35 विकेट्‌सचा विक्रम आवाक्‍यात 

कारकिर्दीत प्रथमच सरावाविना खेळणार आहे; पण चक्रीवादळामुळे काय घडले हे पाहता आमच्या सरावास जास्त महत्त्व देणे अयोग्य आहे. 
- ऍलिस्टर कुक, इंग्लंड कर्णधार 

मालिकेतील 4-0 अशा विजयाचा विचार न करता आम्ही ही कसोटी कशी जिंकता येईल, याचा स्वतंत्रपणे विचार करत आहोत. मालिकेचा निकाल काहीही असो, जिंकण्याची महत्त्वाकांक्षा कायम असणे महत्त्वाचे आहे. 
- विराट कोहली

Web Title: india vs england