तिसर्‍या सामन्यासह इंग्लंडने मालिका जिंकली

सुनंदन लेले 
Wednesday, 18 July 2018

लीड्स - आदील रशीदने भारतीय फलंदाजांभोवती फिरकीचे जाळे टाकले. कप्तान विराट कोहलीसह तीन फलंदाजांना बाद करून आदील रशीदने भारताचा डाव ८ बाद २५६  रोखण्यात यश मिळवले. पाठलाग करताना इंग्लिश फलंदाजांना जास्त अडचणीत भारतीय गोलंदाज टाकू शकले नाही. ज्यो रूटने लागोपाठच्या दुसर्‍या सामन्यात संघाला विजयी करून देणारी खेळी रचली. रूटने इयॉन मॉर्गनसह १८६ धावांची भागीदारी करताना इंग्लंडला  ४५ व्या षटकात विजयी धावांचा टप्पा ओलांडून दिला. पहिला सामना गमावल्यावर पुढचे दोन सामने उत्तम खेळ करून यजमान संघाने मालिका जिंकली.   

इंग्लंड कप्तान मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात दणकेबाज शतक ठोकणारा रोहित शर्मा सलग दुसर्‍या सामन्यात अपयशी ठरला. शिखर धवनने झकास फटकेबाजी करताना जम बसवला. चोरटी धाव काढायच्या विचारात असलेल्या शिखरने क्रीजमधे परतताना थोडी ढिलाई केली आणि तो ४४ धावांवर धावबाद झाला.

एव्हाना विराट कोहलीची फलंदाजी रंग दाखवू लागली होती. मोठ्या मैदानावर मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा जमा करण्यावर विराटचा भर दिसला. संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने पहिल्यापासून आत्मविश्वासाने फलंदाजी केली. भागीदारी रंगत येत होती त्याच वेळी आदील रशीदने लेगस्पीनची कमाल दाखवली. दिनेश कार्तिकने बॅटने चेंडू स्टंपवर ओढवला. नंतर आदील रशीदने ७१ धावा करून मस्त फलंदाजी करणार्‍या विराट कोहलीला लेगस्पीन टाकून बोल्ड केले तो चेंडू अफलातून होता. पुढच्याच षटकात आदील रशीदने सुरेश रैनाला वळणारा चेंडू टाकून झेल द्यायला भाग पाडले. 

मुख्य फलंदाज बाद झाल्यावर धोनी कोषात जाऊन फलंदाजी करू लागला. धावसंख्या वाढवायचे धोनीने ४२ धावा काढून प्रयत्न केले.  भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूरने ३५ धावांची उपयुक्त भागीदारी केल्याने ५० षटकांच्या खेळात भारताला २५६ धावांची मजल गाठता आली. 

विराट कोहलीने अगम्य निर्णय घेताना नवा चेंडू हार्दिक पंड्याला टाकायला दिला. पाठलाग चालू केल्यावर जॉनी बेअरस्टोने सुरुवातीला कडाकड ७ चौकार मारले. शार्दूल ठाकूरने जॉनी बेअरस्टोला बाद करून चौकारांचा ओघ रोखला. सलामीला आलेला जेम्स व्हीन्स चांगली फलंदाजी करता असताना धावबाद झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना ज्यो रूट - इयॉन मॉर्गनच्या जोडीने आरामात चोपून काढले. चहल - कुलदीप फिरकीला खेळताना दोघा फलंदाजांना जास्त त्रास झाला नाही. ३०व्या षटकातच सामना भारतीय संघापासून लांब जात असल्याची निशाणी दिसू लागली. 

दोघा खेळाडूंनी दर्जेदार फलंदाजी करताना घाई गडबड न करता ४५ व्या षटकात इंग्लंडचा विजय नक्की केला. ज्यो रूट १०० तर मॉर्गन ८८ धावांवर नाबाद राहिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs england 3rd ODI cricket