esakal | "वन-डे' यशाचा आत्मविश्‍वास कसोटी मालिकेत पणास लावू - बेअरस्टॉ 
sakal

बोलून बातमी शोधा

India vs England Bairstow says will take confidence of ODI triumph into test

विराट कोहलीच्या भारताविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील विजयामुळे लाभलेला आत्मविश्‍वास कसोटी मालिकेत पणास लावू, अशी भावना इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टॉ याने व्यक्त केली. 

"वन-डे' यशाचा आत्मविश्‍वास कसोटी मालिकेत पणास लावू - बेअरस्टॉ 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन - विराट कोहलीच्या भारताविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील विजयामुळे लाभलेला आत्मविश्‍वास कसोटी मालिकेत पणास लावू, अशी भावना इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टॉ याने व्यक्त केली. 

इंग्लंडला टी-20 मालिकेनंतर वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावे लागले; पण सलग दोन सामने जिंकून त्यांनी पुनरागमन यशस्वी केले. त्यामुळे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान त्यांना आणखी भक्कम करता आले. 

बेअरस्टॉ 28 वर्षांचा आहे. तो म्हणाला की, "कसोटी आणि वन-डे मालिकेदरम्यान काही वेगळे खेळाडू येतात. साहजिकच मालिका विजयाची पार्श्‍वभूमी आत्मविश्‍वास उंचावणारी ठरते. भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर आम्ही अव्वल आहोत. साहजिकच आमच्यावर मालिका जिंकण्याचे दडपण होते. आम्ही ही कामगिरी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील होतो.' 

यश मिळाले असले तरी कसोटी क्रिकेट पूर्णपणे वेगळे असल्याचे स्पष्ट करून बेअरस्टॉ म्हणाला की, "कसोटी म्हणजे वेगळा फॉर्म्युला, वेगळा प्रकार आणि संघातील काही खेळाडूसुद्धा वेगळे असतात.' 

ज्यो रूटला श्रेय 
ज्यो रूट हा इंग्लंडचा कसोटी कर्णधार आहे. झटपट क्रिकेटसाठी संघातील स्थान कमावण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. शेवटच्या दोन्ही सामन्यांत त्याने शतके काढली. त्याला श्रेय देत बेअरस्टॉ म्हणाला की, "रूटची खेळी पाहताना मजा आली. "मालिकावीर' पुरस्काराचा तो सार्थ मानकरी होता. त्याने खेळपट्टीवर उतरून आमच्या संघाला दिशा दिली. खास करून हेडिंग्लेवरील त्याची खेळी मोलाची होती. हाच फॉर्म तो कायम राखण्याची आशा आहे,' असे बेअरस्टॉ याने सांगितले. 

दोन्ही क्रिकेटमध्ये टोकाची कामगिरी 
दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडची कामगिरीसुद्धा टोकाची झाली आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली वन-डे संघाने मागील आठ मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. दुसरीकडे कसोटी संघ मात्र जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरला असून, गेल्या तीन मालिका त्यांना जिंकता आलेल्या नाहीत. त्याचवेळी त्यांना केवळ एकच कसोटी जिंकता आली आहे. 

loading image