शेपटाची डोकेदुखी कायम इंग्लंडची मजल 332 धावांपर्यंत

सुनंदन लेले
Sunday, 9 September 2018

मालिका यापूर्वीच गमावलेल्या भारतीय संघासाठी इंग्लंडचे शेपूट पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही डोकेदुखी ठरले. 7 बाद 198 वरून इंग्लंडने दुसऱ्या दिवशी तब्बल 134 धावांची भर घातली. 332 धावांपर्यंत मजल मारत यजमानांनी भारताचे "डेड रबर' जिंकण्याचे मनसुबे निम्मे तरी निकालात काढले.

लंडन- मालिका यापूर्वीच गमावलेल्या भारतीय संघासाठी इंग्लंडचे शेपूट पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही डोकेदुखी ठरले. 7 बाद 198 वरून इंग्लंडने दुसऱ्या दिवशी तब्बल 134 धावांची भर घातली. 332 धावांपर्यंत मजल मारत यजमानांनी भारताचे "डेड रबर' जिंकण्याचे मनसुबे निम्मे तरी निकालात काढले.

वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करून प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवतात आणि मग डाव संपवण्याची अपेक्षा असताना शेपूट वळवळते. दुसऱ्या दिवशी हेच घडले. 7 बाद 181 वरून तळातल्या फलंदाजांना हाताशी धरत बटलरने अंत पाहिला. त्याच्या 89 धावा इंग्लंड संघाला तारून गेल्या. चहापानाला भारतीय फलंदाजांनी 1 बाद 53 धावा जमा केल्या होत्या.

खेळ चालू होताना इंग्लंडच्या उरलेल्या तीन फलंदाजांना बाद करायला भारतीय गोलंदाज सापळा रचणार होते. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चेंडू जरा चांगला बॅटवर यायला लागला. बटलरने इतर फलंदाजांप्रमाणे टुकूटुकू फलंदाजी केली नाही. विराटने क्षेत्ररचना पांगवून मोठी चूक केली. बटलरने मोकळ्या जागेत चेंडू मारून धावा पटापट जमा केल्या. बुमराने रशिदला बाद केल्यावर ब्रॉडने बटलरला उत्तम साथ दिली. पहिल्या दोन तासांच्या खेळात इंग्लंडने 100 पेक्षा जास्त धावा वाढवून अडचणीतून मार्ग काढला. भारतीय गोलंदाजांनी खूप वेळा फलंदाजांना चकवले; पण नशिबाने चेंडू बॅटची कड काही घेत नव्हता. 

उपहारानंतर जडेजाला हवेतून फटका मारताना ब्रॉडचा उडालेला कठीण झेल राहुलने मागे पळत जात सूर मारत मस्त पकडला. त्यानंतर बटलरने बॅटचा वापर तलवारीसारखा करत झपाट्याने धावा वाढवल्या. 89 धावा करून शेवटी बटलरला जडेजाने बाद केले आणि इंग्लंडचा डाव 332 धावांवर संपला. जडेजाने 4 आणि बुमरा- ईशांतने प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले. खूप चांगली गोलंदाजी करून मोहंमद शमीची पाटी कोरडी राहिली ज्याचे वाईट वाटले. 

भारताची फलंदाजी चालू झाल्यावर ब्रॉडने धवनला लगेच बाद करून पहिला धक्का दिला. लोकेश राहुल नक्कीच काहीतरी वेगळा विचार करून मैदानात आला होता. राहुलने पहिल्यापासून गोलंदाजांना उभाच मान देत बसण्यापेक्षा संधी मिळताक्षणी चेंडूंना फटकावणे चालू केले. चहापानाला 1 बाद 53 धावा दिसत असताना राहुल 35 धावा, तर पुजारा 15 धावा काढून नाबाद परतले. पाचव्या कसोटी सामन्यावर जम बसवायचा असेल तर पहिल्या डावात चांगली फलंदाजी करून मोठी आघाडी घेण्याची संधी भारतीय फलंदाजांना साधावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs England Cricket 5th Test at The Oval England 332 all out