भारतासमोर धवनच्या फॉर्मची चिंता 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 July 2018

इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे. 
 

लंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे. 

दिनेश कार्तिक, राहुल, विराट कोहली यांची अर्धशतके आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवचे चार विकेट समाधान देणारे आहे; परंतु प्रमुख गोलंदाजांच्या दुखापती भारताची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमरा पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांना मोठा भार सांभाळावा लागणार आहे. सराव सामन्यासाठी सराव करताना दुखापत झालेल्या आर. अश्‍विनने सामना संपता संपता तिसऱ्या दिवशी पाच षटके गोलंदाजी केली. येत्या काही दिवसांत त्याची तंदुरुस्ती तपासूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. 

खराब मैदानामुळे भारताने चार दिवसांचा हा सामना तीन दिवसांचा केला; परंतु पहिल्या दिवशी अखेरच्या सत्राचा अपवाद वगळता भारतीय संघ बॅकफूटवरच राहिला आहे. हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीवर इसेक्‍सला पूर्ण डाव गुंडाळता आला नाही. 

शिखर धवन आणि मुरली विजय ही सलामीची जोडी खेळवली जाईल अशी शक्‍यता आहे; परंतु या सराव सामन्यात शिखर धवन दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. त्याच वेळी मुरली विजय आणि राहुल यांनी पहिल्या डावात अर्धशतके केल्यामुळे कसोटीसाठी त्यांचाच प्राधान्याने विचार होऊ शकतो. उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेचेही अपयश विचार करायला लावणारे आहे. भारताच्या गेल्या काही कसोटी सामन्यांत तो अपयशी ठरत आहे. इसेक्‍सविरुद्धच्या या सराव सामन्यात त्याने पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात नाबाद 19 धावा केलेल्या आहेत; परंतु मधल्या फळीसाठी दुसरा ठोस पर्याय नसल्यामुळे रहाणेला पहिल्या कसोटीसाठी पसंती मिळण्याची शक्‍यता आहे. 

संक्षिप्त धावफलक ः भारत, पहिला डाव ः 395 आणि दुसरा डाव ः 2 बाद 89 (राहुल नाबाद 36, धवन 0, चेतेश्‍वर पुजारा 23, रहाणे नाबाद 19); इसेक्‍स, पहिला डाव ः 8 बाद 359 घोषित (वेस्टली 57, पेपर 68, वॉल्टर 75, उमेश यादव 35-4, ईशांत शर्मा 59-3) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Vs England Shikhar Dhawans Form Is A Big Concern