कूकसमोरील चिंता वाढणार

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नवी दिल्ली  - "वरदा'च्या तडाख्यानंतर संयोजकांसमोर पाचवा कसोटी सामना खेळवण्याचे आव्हान असताना, दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकसमोरील आव्हानं अधिक कठिण करण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे.

मुंबई कसोटी सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारताच्या विराट सेनेने सलग 18 कसोटी सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी केली. तुफान फॉर्ममध्ये असलेला कर्णधार विराट कोहली आणि अश्‍विनसह प्रत्येक खेळाडू पाचव्या सामन्यांतही विजय मिळविण्याच्या इराद्याने पेटून उठला आहे.

इंग्लंडने भारताविरुद्ध गेल्या तीन मालिकेत विजय मिळविला होता. पण, सलग चौथ्या मालिकेत इंग्लंड साध्या विजयापासूनही दूर आहे.

कर्णधार कूकदेखील अपयशी ठरला आहे. अपयशाचे धनी होण्यास तो सज्ज नाही. त्यामुळेच माजी कर्णधार नासिर हुसेन याने त्याच्यावर टीका केली आहे. तो म्हणाला, ""कर्णधारपद ही एक जबाबदारी आहे. यानंतरही तो स्वतःला गृहित धरत असेल, तर त्याने कर्णधारपदाची जबाबदारी ज्यो रुटकडे देण्यास सज्ज रहावं. कर्णधारपदाची जबाबदारी इतकी सहजपणे कधी घ्यायची नसते.''

एकूणच त्यामुळे वैयक्तिक फॉर्म आणि कर्णधार अशा दुहेरी काळजीत अडकलेल्या कूकभोवती आव्हानांचा डोंगर उभा करण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत.
त्याचवेळी दुसरीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली याला मालिकेतील सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे. कोहलीने आतापर्यंत 640 धावा केल्या असून, एका मालिकेत सर्वाधिक 774 धावांचा विक्रम भारताकडून सुनील गावसकर यांनी 1971च्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत केला होता. कोहलीप्रमाणे अश्‍विनसाठीदेखील ही मालिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटीत 27 गडी बाद केले आहेत.

भारताचे मार्गदर्शन अनिल कुंबळे यांनी याचे सगळे श्रेय सांघिक कामगिरीला दिले. ते म्हणाले, ""संघातील प्रत्येकाने आपले योगदान दिले आहे. यातही काही खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीने स्वतःची मोहोर उमटवली आहे. परिस्थिती आणि जबाबदारी दोन्हीचे चांगले भान प्रत्येकाकडे आहे. त्यामुळेच हा संघ विशेष ठरतो.''

भारतीय संघात बदल अपेक्षित नाहीत. इंग्लंड संघ मात्र संघात एखादा अधिक फिरकी गोलंदाज खेळविण्याचा विचार करेल यात शंका नाही. त्याचवेळी स्टुअर्ट ब्रॉड संघात पुन्हा येईल अशी इंग्लंडला आशा आहे. तो खेळल्यास जॅक बॉल याला बाहेर जावे लागेल.

Web Title: india vs england test match