दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाची सत्त्वपरीक्षा 

Thursday, 4 January 2018

परदेश दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला नेहमी एक अपेक्षांची किनार असते. मायदेशात सगळेच क्रिकेट संघ उत्तम कामगिरी करत असताना दौऱ्यावर गेल्यावर तोच विजय संघ अचानक निष्प्रभ दिसू लागतो. विराट कोहलीला क्रिकेट जगतातील याच समीकरणाला छेद द्यायची इच्छा आहे. भारतीय संघ परदेशातही उत्तम कामगिरी करायची क्षमता राखून आहे हे सिद्ध करायची वेळ आली आहे असा भारतीय संघ व्यवस्थापनाचा विश्‍वास आहे. 

केपटाऊन : मायदेशात सलग मालिका जिंकणाऱ्या आणि आयसीसी कसोटी मानांकनात अव्वल स्थानी असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची परदेशातील क्रिकेट सत्त्वपरीक्षा उद्यापासून (शुक्रवार) बघितली जाणार आहे. भारतीय संघ 2018 सालात तीन मोठे परदेश दौरे करणार असून त्यातील पहिल्या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना केपटाउनच्या न्यूलंडस्‌ मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान रंगणार आहे. एकही सराव सामना न खेळता भारतीय संघ थेट कसोटी सामना खेळणार असून, कोहलीसेना दर्जेदार दक्षिण आफ्रिकन संघाला कशी लढत देतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

परदेश दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला नेहमी एक अपेक्षांची किनार असते. मायदेशात सगळेच क्रिकेट संघ उत्तम कामगिरी करत असताना दौऱ्यावर गेल्यावर तोच विजय संघ अचानक निष्प्रभ दिसू लागतो. विराट कोहलीला क्रिकेट जगतातील याच समीकरणाला छेद द्यायची इच्छा आहे. भारतीय संघ परदेशातही उत्तम कामगिरी करायची क्षमता राखून आहे हे सिद्ध करायची वेळ आली आहे असा भारतीय संघ व्यवस्थापनाचा विश्‍वास आहे. 

यजमान दक्षिण आफ्रिका संघ नुसताच गुणवान नाही तर समतोल आहे. संघात हाशिम आमला आणि एबी डिव्हीलीयर्स सारखे सर्वोत्तम फलंदाज आहेत तसेच क्वींटन डिकॉक सारखा तरुण गुणवान फलंदाज आहे. संघात अनुभवी डेल स्टेन, फिलॅंडरसारखे गोलंदाज आहेत तसेच केशव महाराज आणि कंगिसो रबाडा सारखा दर्जेदार तरुण गोलंदाज आहे. संघाचे नेतृत्व फाफ डु प्लेसी हा शांत समंजस खेळाडू करत असल्याने यजमान संघाची ताकद वेगळी सांगायची गरज नाही. केपटाउन सामन्यात संघात डेल स्टेनला पुनरागमनाची संधी दिली जाते का इतकाच प्रश्‍न बाकी आहे. 

विराट कोहलीला 11 जणांच्या संघात कोणाला जागा द्यायची हा मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याचा फॉर्म खराब असला तरी अजिंक्‍य रहाणेला संघात जागा देण्याचा मोह पडणार कारण रहाणे परदेशात चमकदार फलंदाजी करत आला आहे. दुसरीकडे रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म तुफान असल्याचे त्याला संघात जागा न देणे कठीण जाणार आहे. तीन वेगवान गोलंदाजांच्या यादीत महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार आणि ईशांत शर्माची वर्णी लागेल असे वाटते. एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून अश्‍वीनला संधी मिळेल. 

केपटाउन शहरावर दुष्काळाची छाया असल्याने न्यूलंडस्‌ मैदानावरील खेळपट्टीवर पाण्याचा अंश कायम ठेवून त्यावरील गवत हिरवे राखायचा प्रयत्न करताना माळ्यांच्या नाकी दम येतो आहे. खेळपट्टी पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करेल नंतर ती फलंदाजांना साथ देईल असा अंदाज आहे. महान माजी खेळाडू कॅलिसच्या मते सर्व खेळ नवीन चेंडूवरचा आहे. नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना फलंदाजांना बाद करणे आणि फलंदाजी करताना विकेट जाऊन न देणे असा हा खेळ असेल. जो संघ ते साध्य करण्यात यशस्वी होईल तो सामन्यावर वर्चस्व गाजवेल असे कॅलिस म्हणाला. 

गेल्या दौऱ्यात केपटाउनला कसोटी सामना झाला नव्हता त्याचा विचार करता भारतीय संघ कशी लढत यजमान संघाला देतो हे बघायला प्रेक्षक मैदानावर गर्दी करतील अशी खात्री संयोजक बाळगून आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs South Africa cricket test series starts in Capetown