भारत-दक्षिण आफ्रिका आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना
मोहाली - भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील धरमशाला येथील पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पावसाचाच खेळ झाल्यानंतर आता उद्या मोहालीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्याचे वेध लागले आहेत. येथे वरुणराज नव्हे, तर चौकार-षटकारांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत आहेत. तीन सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी या सामन्यात बाजी मारणे आवश्यक आहे.
भारतातून मॉन्सूनने अजून काढता पाय घेतलेला नाही, त्यामुळे सर्वत्र पावसाचा प्रभाव आहे. धरमशाला येथे तर एकाही चेंडूचा खेळ पावसाने होऊ दिला नाही. मोहालीत 5 ते 10 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता खरी ठरली तरी बऱ्यापैकी खेळ होऊ शकेल असा अंदाज आहे.
अजूनपर्यंत मॉन्सूनच सुरू असल्यामुळे कर्नाटकमध्ये प्रथम श्रेणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने झाले आहेत. उत्तर भारतात अजून सामने झालेले नाहीत, त्यामुळे मोहालीत खेळपट्टीबाबतही झाकली मूठ सव्वालाखाची आहे. मोहाली स्टेडियमच्या खेळपट्टीवर यंदाच्या मोसमातील एकही सामना न झाल्यामुळे चांगल्या प्रमाणात धावा होऊ शकतील, असे क्युरेटर दलजित सिंग यांनी सांगितले आहे.
खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच टीम इंडियाची निवड केली जाईल. त्यात एक की दोन फिरकी गोलंदाज खेळवायचे की अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी द्यायची यावर खल केला जाईल. वेस्ट इंडीज दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ एकही सामना खेळलेला नसल्यामुळे प्रत्येकाला पहिल्या चेंडूपासून लय मिळवावी लागेल.
मोहालीचे मैदान किंग कोहलीसाठी फलदायी ठरलेले आहे. 2016 मधील ट्वेन्टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोहलीने तुफानी खेळी साकार करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. या खेळीत त्याने तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह निर्णायक भागीदारी केली होती. त्यात या दोघांनी दोन-दोन धावा अतिवेगात पळून काढल्या होत्या. त्यावेळचे छायाचित्र कोहलीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली होती.
(सामन्याची वेळ - सायं. 7 पासून, थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस)
|