दक्षिण आफ्रिकेला गुंडाळल्यावर भारताची पडझड 

Saturday, 6 January 2018

पहिल्या दिवशीचा आमचा खेळ मनासारखा झाला. टॉस जिंकलो असतो तर गोलंदाजीच करणार होतो. म्हणून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर काहीच वाटले नाही. सुरुवातीला फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले कि वेगळे समाधान मिळते. डिव्हिलियर्स महान फलंदाज आहे. त्याने फटकेबाजी करून आमची लय बिघडवली.  वाटते कि झेल पकडण्याबाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. आजच्या खेळात समोरच्या फलंदाजांनी षटकामागे धावांची गती चांगली राखली त्याचापण आम्हाला विचार करावा लागेल. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला भक्कम खेळ करून धावा जमा कराव्या लागतील. समोर दर्जेदार गोलंदाज आहेत. धावा काढणे अशक्य नाही असे मला वाटते.
- भुवनेश्वर कुमार

केप टाऊन : भारतीय वि. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा पहिला दिवस रंगतदार खेळाने गाजला. निसर्गसुंदर न्यूलॅंड्‌स मैदानावर पहिल्या दिवशी 13 विकेट्‌स पडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर यजमान संघाला 286 धावांवर रोखण्यात यश आले ते भारतीय गोलंदाजांनी कंबर कसल्यानेच. भुवनेश्‍वरकुमारने जबरदस्त मारा करून चार फलंदाजांना तंबूत पाठवले. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने पाच झेल पकडून गोलंदाजांना उत्तम साथ दिली. उरलेल्या एका तासाच्या खेळात भारतीय संघाच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आल्याने भारतीय संघाचा पहिल्या दिवशीच्या खेळावरचा वरचष्मा खाली आला. 

त्याचबरोबर सहा फलंदाजांना घेऊन कसोटीत सावध पवित्रा घेणेही विराट कोहलीने टाळले. चार प्रमुख गोलंदाजांसह हार्दिक पंड्याला जागा देताना कोहलीने धोका पत्करायची तयारी दाखवली. जसप्रीत बुमरा आणि रोहित शर्माला संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने डेल स्टेन आणि ए बी डिव्हिलर्सच्या अनुभवाला संघ निवड करताना पसंती दिली. 

नाणेफेक जिंकून फाफ डू प्लेसिसने फलंदाजांचा अपेक्षित निर्णय घेतला. भुवनेश्‍वरकुमारने पहिल्याच षटकात चिवट फलंदाज डीन एल्गरला बाद केले. भुवनेश्‍वरने मोठी खेळी उभारण्यात तरबेज असलेल्या हशीम आमलाला बाद करून यजमानांना दुसरा धक्का दिला. दडपणाखाली खचेल तो ए बी डिव्हिलियर्स कसला. त्याने मैदानात पाऊल ठेवल्यापासून टकाटक फटके लगावले. फाफ डिू प्लेसिसबरोबर शतकी भागीदारी करून दोघांनी मोठी घसरण रोखली. 

उपाहारानंतर प्रत्येकी अर्धशतक करून दोघांनी जम बसलेल्या फलंदाजांना बाद करण्यात यश आले. बुमराने ए बी डिव्हिलियर्सला (65 धावा) बोल्ड केले आणि हार्दिक पंड्याने फाफ डू प्लेसिसला (62 धावा) बाद केले. प्रमुख फलंदाज बाद झाले तरी धावांचा ओघ संपला नाही. क्‍विंटन डिकॉकने फिलॅंडरसोबत भागीदारी रचताना झटपट 43 धावा केल्या. त्यांच्या तळातील फलंदाजांनीही चिवट प्रतिकार केल्याने दक्षिण आफ्रिकेला 286 धावांची मजल मारता आली. 

दिवसातील उरलेल्या 13 षटकांत भारतीय फलंदाजांची परीक्षा बघितली जाणार होती. दर्जेदार वेगवान गोलंदाजांना तोंड देताना भारताच्या सलामीवीरांना कठीण गेले. विजय आणि शिखर धवन लवकर बाद झाले. मॉर्ने मॉर्कलने गोलंदाजीला आल्यावर पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद करून भारतीय संघाला मोठा धक्का दिला. खेळं संपला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 28 अशी होती. रोहित शर्मा 0 आणि चेतेश्‍वर पुजारा 5 धावांवर खेळत होते. 

भारत 11 षटकांत 3 बाद 28 (चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे 5, रोहित शर्मा खेळत आहे 0, शिखर धवन 16, फिलॅंडर 1-13, स्टेन 1-13, मॉर्केल 1-0)

पहिल्या दिवशीचा आमचा खेळ मनासारखा झाला. टॉस जिंकलो असतो तर गोलंदाजीच करणार होतो. म्हणून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर काहीच वाटले नाही. सुरुवातीला फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले कि वेगळे समाधान मिळते. डिव्हिलियर्स महान फलंदाज आहे. त्याने फटकेबाजी करून आमची लय बिघडवली.  वाटते कि झेल पकडण्याबाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. आजच्या खेळात समोरच्या फलंदाजांनी षटकामागे धावांची गती चांगली राखली त्याचापण आम्हाला विचार करावा लागेल. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला भक्कम खेळ करून धावा जमा कराव्या लागतील. समोर दर्जेदार गोलंदाज आहेत. धावा काढणे अशक्य नाही असे मला वाटते.
- भुवनेश्वर कुमार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs South Africa in Cape Town Bhubneshwar Kumar bowling