धवन, रोहितच्या समावेशावर 'दादा'कडून प्रश्न

वृत्तसंस्था
Wednesday, 10 January 2018

शिखर धवन आणि रोहित शर्माची परदेशातील कामगिरी पाहिली तर ती चांगली नाही. या दोघांच्या मायदेशातील आणि परदेशातील कामगिरीवर मोठा फरक आहे. सलामीच्या फळीत फक्त मुरली विजय आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. चेतेश्वर पुजाराचीही 14 पैकी तेरा शतके उपखंडातील आहेत. के एल राहुलची कामगिरी परदेशातील चांगली आहे.

कोलकता - केपटाऊन येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात शिखन धवन आणि रोहित शर्मा यांच्या समावेशावर माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रश्न उपस्थित केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताला 207 धावांचे आव्हान पेलविले नव्हते. अजिंक्य रहाणेला वगळून रोहित शर्माचा समावेश करण्यात आल्याने टीका होत असताना आता गांगुलीनेही या दोन खेळाडूंचा अंतिम अकरामध्ये समावेश केल्याने प्रश्न उपस्थित केला.

गांगुली म्हणाला, की शिखर धवन आणि रोहित शर्माची परदेशातील कामगिरी पाहिली तर ती चांगली नाही. या दोघांच्या मायदेशातील आणि परदेशातील कामगिरीवर मोठा फरक आहे. सलामीच्या फळीत फक्त मुरली विजय आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. चेतेश्वर पुजाराचीही 14 पैकी तेरा शतके उपखंडातील आहेत. के एल राहुलची कामगिरी परदेशातील चांगली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेत कामगिरी केली आहे. कसोटीच्या निकालाबद्दल मला आश्चर्य वाटले नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघामध्ये क्षमता असून, ते नक्कीच मालिकेत पुनरागमन करतील. दुसऱ्या कसोटीत शिखर धवनऐवजी राहुलला खेळविले पाहिजे. पण, संघात पाच गोलंदाज असणे आवश्यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs South Africa Sourav Ganguly Questions Rohit Sharma, Shikhar Dhawan's Inclusion In Playing XI