प्रदूषणामुळे महंमद शमीलाही उलटी

वृत्तसंस्था
Wednesday, 6 December 2017

2020 पर्यंत लढतीच नाहीत 
श्रीलंका-भारत कसोटीतील प्रदूषणाच्या प्रश्नाची भारताच्या यशापेक्षा जास्त चर्चा होत आहे; पण आता 2020 पर्यंत नवी दिल्लीत एकही आंतरराष्ट्रीय लढत होणार नाही; मात्र याचे कारण प्रदूषण नसून नवा दौरा कार्यक्रम आहे. 

नवी दिल्ली : भारत-श्रीलंका कसोटीच्या चौथ्या दिवशीही प्रदूषणाचे ढग जास्तच गडद झाले. दुसऱ्या दिवशी मास्क लावणाऱ्या खेळाडूंवर टीका करणाऱ्या भारतीयांना महंमद शमीला प्रदूषणामुळे मैदानात उलटी झाल्याने आपले शब्दच मागे घ्यावे लागले. त्याचबरोबर श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमल यालाही वांत्या झाल्या. 

श्रीलंकेच्या तिघांना फटका 
श्रीलंका खेळाडूंनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याने मास्क परिधान केले होते; पण गोलंदाजी करत असल्याने लकमलने मास्क परिधान केले नव्हते. भारताच्या दुसऱ्या डावातील दुसऱ्या षटकात लकमलला उलटी झाली. त्यापूर्वी काही चेंडूच अगोदर त्याने विजयला बाद केले होते. संघ फिजिओंच्या मदतीने लकमलने मैदान सोडले आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊन विश्रांती घेतली. त्याने काही वेळानंतर मैदानात येऊन गोलंदाजी केली. 

लकमलप्रमाणेच श्रीलंकेच्या अन्य तीन खेळाडूंनाही प्रदूषणाचा त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांची सखोल तपासणी केल्याचे श्रीलंका संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले. 

आम्ही काही सांगण्याची गरजही नाही. सर्व काही स्पष्टपणे दिसत आहे. आमच्या हातात केवळ खेळणेच आहे. आम्ही व्यावसायिक आहोत. याबाबत बोलून जास्त काही साधणार नाही, असे श्रीलंकेचे मार्गदर्शक निक पोथाज यांनी सांगितले. 

श्रीलंका संघाने प्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे रविवारी (दुसऱ्या दिवशी) तीनदा खेळ थांबला होता. परिस्थिती जेवढी वाईट दाखवली जात आहे, तेवढी नाही, असा दावा महंमद शमीने तिसऱ्या दिवशी केला होता; पण चौथ्या दिवशी तोच आजारी पडला. त्यालाही तिसऱ्या सत्रात उलट्या झाल्या. शमी त्यानंतर मैदानातच पाणी प्यायला. लगेचच कोहलीने त्याला गोलंदाजीपासून दूर केले, तसेच त्याला विश्रांतीसाठी मैदानाबाहेरही पाठवण्यात आले. 

दिल्लीबाहेरच असलेल्यांना... 
शमीला उलट्या झाल्यामुळे अखेर भारतीय फलंदाज धवनला बचावात्मक व्हावे लागले. दिल्लीतील वातावरणाची श्रीलंका संघातील खेळाडूंना सवय नाही, तसेच भारतीय संघातील खेळाडूंनाही नाही; मात्र सोपवलेली जबाबदारी पार पाडणे भाग असते. श्रीलंकेस प्रदूषणाचा त्रास नक्कीच होत असेल. दिल्लीत प्रदूषण नाही, हे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे धवनने सांगितले. त्याच वेळी त्याने शमी पाचव्या दिवशी गोलंदाजी करू शकेल, असे सांगितले. 

दिल्लीतील सध्याच्या वातावरणात खेळणे खूपच धोकादायक आहे. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष के. के. अगरवाल यांनी सांगितले. आयसीसीने याबाबत टिप्पणी करणे टाळले आहे. अमेरिकन दूतावासाने शक्‍यतो घराबाहेर पडू नका, असाच सल्ला संकेतस्थळावरून दिला आहे. 

2020 पर्यंत लढतीच नाहीत 
श्रीलंका-भारत कसोटीतील प्रदूषणाच्या प्रश्नाची भारताच्या यशापेक्षा जास्त चर्चा होत आहे; पण आता 2020 पर्यंत नवी दिल्लीत एकही आंतरराष्ट्रीय लढत होणार नाही; मात्र याचे कारण प्रदूषण नसून नवा दौरा कार्यक्रम आहे. 

भारताने नव्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात फेब्रुवारी-मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय लढती भारतात घेण्याची मागणी केली आहे. भारतातील लढतींची ठिकाणे रोटेशननुसार ठरतात. नवी दिल्लीत नोव्हेंबरला एकदिवसीय लढत झाली, तर आता कसोटी होत आहे. आता नव्या वर्षात भारतीय संघ प्रामुख्याने परदेशात खेळणार आहे. त्यानंतर 2019 मध्ये फेब्रुवारी मार्चमध्येच लढती भारतात होतील आणि त्या वेळी दिल्लीस संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे फार तर लढत 2020 मध्येच होईल. 

भविष्यात दिल्लीत या कालावधीत सामने आयोजित करण्याबाबत नक्कीच विचार होऊ शकेल. आम्ही दिल्लीतील धुके तसेच प्रदूषणाच्या प्रश्नाबाबत चिंतित आहोत. त्यामुळेच देशांतर्गत लढतीच्या आयोजनाच्या वेळी याचा विचार केला होता. 
- अनिरुद्ध चौधरी, भारतीय क्रिकेट मंडळाचे प्रभारी सचिव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs Sri Lanka: Mohammed Shami Vomits On Field As Hosts Face Pollution Problems