विजय,कोहलीची शतके; भारत मोठ्या धावसंख्येकडे

शनिवार, 2 डिसेंबर 2017

तिसऱ्या कसोटी सामन्याकरता कोहलीने संघात दोन बदल केले. महंमद शमी उमेश यादवच्या जागी आणि के एल राहुलच्या जागी शिखर धवन संघात आले. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यावर कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. 42 धावांची झटपट सलामी दिल्यावर शिखर धवन दिलरुवानला बाद झाला.

नवी दिल्ली : चांगली खेळपट्टी आणि सुमार गोलंदाजी असे मिष्टान्न वाढून ठेवल्यावर दर्जेदार फलंदाज धावांचे भरपेट जेवण न जेवले तर नवल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची संधी मिळाल्यावर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने भलीमोठी भागीदारी रचताना वैयक्तिक शतकांचा टप्पा सहजी पार केला. विजयचे संधी मिळाल्यावरचे सलग दुसरे कसोटी शतक तर कप्तान कोहलीने सलग तीन कसोटी डावात तीन शतके पूर्ण करायचा पराक्रम घरच्या मैदानावर करून दाखवला. खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना भारताचे दोन फलंदाज बाद करण्यात श्रीलंकेला यश आले. पहिल्याच दिवशी भारतीय संघाने 4 बाद 371 धावांचा धावफलक उभा करून तिसऱ्या कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवायच्या प्रवासाला सुरुवात केली. विजयसह केलेल्या 283धावांच्या भागीदारीसह पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा कोहली 156 धावांवर खेळत होता. 

तिसऱ्या कसोटी सामन्याकरता कोहलीने संघात दोन बदल केले. महंमद शमी उमेश यादवच्या जागी आणि के एल राहुलच्या जागी शिखर धवन संघात आले. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यावर कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला. 42 धावांची झटपट सलामी दिल्यावर शिखर धवन दिलरुवानला बाद झाला. आश्‍चर्य म्हणजे चेतेश्‍वर पुजाराने जम बसल्यावर विकेट गमावली. दोन विकेट गेल्याचे प्रेक्षकांना दु:ख झाले नाही कारण स्थानिक हिरो विराट कोहलीने मैदानात दाखल झाला. विजयसह कोहलीने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. 

कोहलीने एकाहून एक विक्रमांची माळ लावली. प्रथम त्याने कसोटी जीवनातील 5हजार धावा पूर्ण केल्या. विजयच्या शतकापाठोपाठ तीन आकडी मजल मारून सलग तीन कसोटीत तीन शतके ठोकणारा विराट पहिला भारतीय कप्तान झाला. त्याचबरोबर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15हजार धावांचा टप्पा पार केला. आणि 2017 सालातील 11वे शतक साजरे केले. विजय - कोहलीच्या फलंदाजीत कमालीची सहजता होती. प्रत्येक षटकात नुसत्या धावा नाही तर संधी मिळताच चौकारांची आतिषबाजी दोघे फलंदाज करत राहिले. 

षटकामागे 4 पेक्षा जास्त धावांची सरासरी राखणे कोहली - विजयला शक्‍य झाले कारण मोठ्या फटक्‍यांसोबतीला अत्यंत वेगाने धावा पळायचा सपाटा दोघांनी लावला होता. गोलंदाजी धार नव्हती हे मान्य केले म्हणून विजय - कोहलीच्या फलंदाजांचे मोल कमी होणार नाही. थकल्या अवस्थेत दोघा फलंदाजांनी एकमेकांना प्रोत्साहन देत अनावश्‍यक फटका मारून विकेट बहाल करायचा दोष टाळला. परंतू काही षटके बाकी असताना विजय संदकनला खेळताना चकला आणि विकेट किपर डिकवेलाने त्याला 155 धावांवर स्टंप केले. पाठोपाठगदी तशीच विकेट अजिंक्‍य रहाणेची गेली. संदकनच्या गोलदांजीवर डिकवेलानेच रहाणेला 1 धावेवर स्टंप केले. पहिल्या दिवशीचा खेळ थांबवला गेला कोहली 156 धावांवर नाबाद राहिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs Sri Lanka Virat Kohli and Murli Vijay century