विंडीजचे भारतासमोर 284 धावांचे आव्हान

Saturday, 27 October 2018

भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. भारताकडून जसप्रीत बुमराने 4 बळी घेतले.

पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. भारताकडून जसप्रीत बुमराने 4 बळी घेतले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर आणि बुमरा या जोडीने विंडीजच्या सलामीवीरांना जखडून ठेवत धावा करू दिल्या नाहीत. चंद्रपॉल हेमराजने बुमराच्या तिसऱ्या षटकात चौकार आणि षटकार खेचून धावगती वाढविली. पण, महेंद्रसिंह धोनी का बेस्ट आहे, हे त्याने धावत जाऊन घेतलेल्या झेलवरून स्पष्ट झाले. धोनीने घेतलेला झेल अप्रतिम होता आणि त्याला प्रेक्षकांनीही तेवढीच दाद दिली. हेमराज 15 धावा करून बाद झाला. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर शाई होपने सलामीवीर किरॉन पॉवेलला साथ देत धावा वाढविल्या. पॉवेलने खलील अहमदच्या पहिल्याच षटकात षटकार व चौकार खेचून त्याची लय बिघडविली. त्याच्या पहिल्याच षटकात 11 धावा ठोकल्या. मात्र, मैदानाच्या दुसऱ्या बाजूने बुमराला गोलंदाजीला उतरविण्याचा निर्णय विराटने घेतला आणि तो यशस्वीही झाला. बुमराने विंडीजला दुसरा धक्का देत पॉवेलला 21 धावांवर रोहित शर्माकरवी स्लिपमध्ये झेलबाद केले. बुमराच्या त्याच षटकात पंचांनी सॅम्युअल्सला पायचीत बाद दिले. पण, रिव्ह्यूमध्ये चेंडू यष्टीवरून जात असल्याचे स्पष्ट झाले. खलीलला अखेर त्याच्या चौथ्या षटकात यश मिळाले. मालिकेत अपयशी ठरलेल्या सॅम्युअल्स या सामन्यातही कमाल दाखवू शकला नाही. तो धोनीकडे झेल देऊन बाद झाला.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या हेटमेरचा फॉर्म या सामन्यातही कायम होता. त्याने सुरवातीपासूनच झटपट धावा करत प्रत्येक षटकात चौकार किंवा षटकार मारत धावा केल्या. त्याला होपनेही चांगली साथ देत अर्धशतकी भागीदारी नोंदविली आणि संघाचे शतक पूर्ण केले. मात्र, कुलदीपच्या फिरकीवर तो फसला, धोनीने चतुराईने त्याला यष्टीचीत बाद केले. हेटमायरने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 21 चेंडूत 37 धावा केल्या. त्यापाठोपाठ रोवमन पॉवेलही कुलदीपचा शिकार ठरला. पॉवेल अवघ्या 4 धावांवर बाद झाला आणि विंडीजचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार जेसन होल्डरने साथ देत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. होपने 72 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. होल्डरला 32 धावांवर बाद करून भुवनेश्वरने विंडीजची मोठ्या धावसंख्येकडे होणारी वाटचाल रोखली. शतकाकडे वाटचाल करत असलेला होपला शतक करण्यात अपयश आले. बुमराने 95 धावांवर असताना त्याचा त्रिफळा उडविला. नर्स आणि रोच यांनी अखेरच्या षटकांमध्ये काही फटके मारत संघाची धावसंख्या अडीचशेच्या पार नेली. 

भारताच्या गोलंदाज चौकडीचे 100 टक्के यश
गोलंदाजीत बुमरा, भुवनेश्वर, चहल आणि कुलदीप या चौघांसह भारताने खेळलेल्या 9 पैकी 9 सामन्यात विजय मिळालेला आहे. तर, या चौघांच्या अचूक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघ फक्त दोनवेळा 240 पेक्षा अधिक धावा करू शकला आहे. 

संक्षिप्त धावफलक : 
वेस्टइंडीज 50 षटकांत 9 बाद 283 (कायरन पॉवेल 21 - 25 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, चंद्रपॉल हेमराज 15, शाई होप 95 - 113 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, शिमरॉन हेटमेर 37 - 21 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, जेसन होल्डर 32 - 39 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, ऍशले नर्स नाबाद 40 - 22 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, भुवनेश्वर कुमार 1-70, जसप्रीत बुमरा 4-35, खलील अहमद 1-65, युझवेंद्र चहल 1-56, कुलदीप यादव 2-52)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs West Indies 3rd ODI Live Cricket Score West Indies set target 284 for India