होपने उडविली झोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 October 2018

भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना टाय
विशाखापट्टणम - विराट कोहलीच्या दे दणादण करणाऱ्या नाबाद दीड शतकाला वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमेर आणि शाई होपने जशास तसे उत्तर दिले आणि भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३२१ धावसंख्येवर टाय झाला. चौकार-षटकारांची तुफान आतषबाजी झालेल्या या सामन्यात कोणीच जिंकू शकले नसले तरी भारताच्या अनुभवी गोलंदाजांना या धावसंख्येचे संरक्षण करता आले नाही.

भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना टाय
विशाखापट्टणम - विराट कोहलीच्या दे दणादण करणाऱ्या नाबाद दीड शतकाला वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमेर आणि शाई होपने जशास तसे उत्तर दिले आणि भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३२१ धावसंख्येवर टाय झाला. चौकार-षटकारांची तुफान आतषबाजी झालेल्या या सामन्यात कोणीच जिंकू शकले नसले तरी भारताच्या अनुभवी गोलंदाजांना या धावसंख्येचे संरक्षण करता आले नाही.

सलग दुसरे शतक आणि वेगवान दसहजारी मनसबदार अशी विक्रमी कामगिरी आज विराट कोहलीने साकार केली आणि भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावा उभारल्या. त्यात ३ बाद ७८ अशी विंडीजची अवस्था केली तेव्हा सामना भारताच्या विजयाचे नगारे वाजू लागले होते; परंतु तेवढ्यात हेटमेर आणि होप्सचा झंझावात सादर झाला आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेला सामना अखेर बरोबरीत राहिला.

विंडीज संघात गेल, पोलार्डसारखे भलेभले फलंदाज नसताना त्यांना हेटमेरच्या रूपाने नवा हिरा सापडला आहे. पहिल्या सामन्यात त्याने तुफानी शतक केले होते. आज ६४ चेंडूत ९४ धावा करून संघाला विजयी पथावर ठेवले होते. त्या वेळी दुसऱ्या बाजूने शाई होप फलंदाजी करत असल्यामुळे विंडीजच्या होप्स कायम होत्या. अखेरच्या चेंडूत त्यांना जिंकायला पाच धावांची गरज असताना होपने उमेश यादवला चौकार मारून सामना टाय केला. त्याने १३४ चेंडूत नाबाद १२३ धावा केल्या.

भारताने आज कुलदीप यादवला संधी दिली. त्याने विंडीजचे सुरवातीचे दोन फलंदाज बाद करून चांगली सुरवात करून दिली होती; परंतु त्यानंतर हेटमेर आणि होप यांनी भारताच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. कोणत्याही क्षणी त्यांनी सामन्यावरचे नियंत्रण ढळू दिले नाही.
 
विराटचा झंझावात
तत्पूर्वी १२९ चेंडूंत आणि मनाला वाटेल तेथे १३ चौकार आणि चार षटकारांची पेरणी आणि धावा नाबाद १५७ अशी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी विराटने साकार केली. त्याचवेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान दहा हजार धावांचा त्याचा आयडॉल असलेल्या सचिन तेंडुलकरला मागे टाकून केलेला विक्रम ही विराटच्या आजच्या खेळीला विक्रमाच्या यादीत मानाचे स्थान मिळवून देणारी ठरली.

४४ धावांवर विराटला विंडीज कर्णधार जेसन होल्डरकडून जीवदान मिळाले होते. हा अपवाद वगळता विराटने संधीच दिली नाही. त्याच्या बॅटमधून केवळ चौकार आणि षटकारांची आतषबाजीच होत नव्हती, तर तीन तासांहून अधिक काळ खेळपट्टीवर राहूनही अखेरच्या षटकांत दोन धावांसाठीची चपळता थक्क करणारी होती. अशाच दोन धावा घेत त्याने दीड शतक पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक
भारत - ५० षटकांत ६ बाद ३२१ (रोहित शर्मा ४, शिखर धवन २९- ३० चेंडू, ४ चौकार, १ षटकार, विराट कोहली नाबाद १५७- १२९ चेंडू, १३ चौकार, ४ षटकार, अंबाती रायडू ७३- ८० चेंडू, ८ चौकार, महेंद्रसिंग धोनी २०- २५ चेंडू, १ षटकार, रिषभ पंत १७- १३ चेंडू, २ चौकार, रवींद्र जडेजा १३- १४ चेंडू, केमार रोच ६७-१, नर्स ४६-२, ओबेद मॅकॉय ७१-२) 

बरोबरी वि. वेस्ट इंडीज - ५० षटकांत ७ बाद ३२१ (शाई होप नाबाद १२३- १३४ चेंडू, १० चौकार, ३ षटकार, शिमरॉन हेटमेर ९४- ६४ चेंडू, ४ चौकार, ७ षटकार), महंमद शमी ५९-१, उमेश ७८-१, कुलदीप ६७-३, चहल ६३-१)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India West Indies One Day Cricket Match