भारताची मालिका विजयांची हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ट्‌वेन्टी-20 मालिकेतही सरशी, चाहलचे सहा बळी

ट्‌वेन्टी-20 मालिकेतही सरशी, चाहलचे सहा बळी
बंगळूर - विराट सेनेने इंग्लंडचा तिसऱ्या आणि अखेरच्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात 75 धावांनी पराभव केला आणि मालिका विजयांची हॅटट्रिक केली. भारतीय संघाने याच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतही यश मिळवलेले आहे. धावांच्या तडाख्यानंतर यजुवेंद्र चाहलने सहा बळी मिळवण्याची करामत केली, त्यामुळे इंग्लंडचे आठ फलंदाज आठ धावांत बाद करून भारताने मोहीम फत्ते केली.

स्वतः विराट अपयशी ठरला तरी भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. सुरेश रैना (45 चेंडूंत 63), महेंद्रसिंग धोनी (36 चेंडूंत 56) आणि युवराज सिंग (10 चेंडूंत 27) या सीनिअर्सनी केलेली तुफानी टोलेबाजी महत्त्वपूर्ण ठरली; तर यजुवेंद्र चाहल या युवा गोलंदाजाची चार विकेटची कामगिरी निर्णायक ठरली. विराटप्रमाणे चाहलचेही हे "घरचे' मैदान आहे.

भारताने द्विशतक केले तरी इंग्लंडकडेही आक्रमक फलंदाज असल्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्‍यता होती. जेसन रॉयनंतर ज्यो रूट आणि मॉर्गन यांनी प्रतिहल्ला केला; परंतु या दोघांना सलग दोन चेंडूंवर बाद करून चाहलने इंग्लंड संघात खळबळ उडवून दिली. त्यानंतर चाहल आणि बुमरा यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. इंग्लंडने 18 चेंडूंत आठ धावांत आठ फलंदाज गमावले.

इंग्लंड - 16.3 षटकांत सर्व बाद 127 (जेसन रॉय 32, ज्यो रूट 42, मॉर्गन 40- 21 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, चाहल 4-0-25-6, बुमरा 2.3-0-14-3)

Web Title: india win 20-20 cricket match