अफगाणिस्तान फलंदाजीची दाणादाण; भारताचा मोठा विजय 

सुनंदन लेले
Friday, 15 June 2018

मर्यादित षटकांच्या क्रिकेट विचारातून अफगाणिस्तान संघ अजून बाहेर आला असे वाटले नाही. बेंगलुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दाणादाण उडवत अफगाणिस्तानचा डाव 27.5 षटकात 109 धावांमधे गुंडाळला. पदार्पणाच्या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की अंगावर आल्यावर दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाच्या माऱ्याने अफगाणिस्तानची फलंदाजी परत एकदा 103 धावांत गडगडली आणि भारतीय संघाने बेंगलुरू कसोटी सामना एक डाव आणि 262 धावांनी जिंकला. दोन दिवसात कसोटी सामना संपण्याची भारतातील ही पहिलीच वेळ ठरली. 

बंगळूरु- मर्यादित षटकांच्या क्रिकेट विचारातून अफगाणिस्तान संघ अजून बाहेर आला असे वाटले नाही. बेंगलुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दाणादाण उडवत अफगाणिस्तानचा डाव 27.5 षटकात 109 धावांमधे गुंडाळला. पदार्पणाच्या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की अंगावर आल्यावर दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाच्या माऱ्याने अफगाणिस्तानची फलंदाजी परत एकदा 103 धावांत गडगडली आणि भारतीय संघाने बेंगलुरू कसोटी सामना एक डाव आणि 262 धावांनी जिंकला. दोन दिवसात कसोटी सामना संपण्याची भारतातील ही पहिलीच वेळ ठरली. 

शिखर धवनला सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक पंड्याने एकदम कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करून छाप पाडली. त्याने 71 केल्याने भारताला 450 धावांचा टप्पा पार करताना अडचण आली नाही. भारताचा डाव 474 धावांवर संपला तेव्हा यामीद अहमदझाईच्या गोलंदाजीने प्रेक्षक खूश झाले. अहमदझाईने 51 धावांमधे 3 फलंदाजांना बाद केले. रशिद खानला दोन बळी मिळाले त्याकरता 154 धावांची आहुती त्याला द्यावी लागली. अफगाणिस्तानचे फलंदाज काय पवित्रा घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. उंचीने कमी आणि काहीसा जाड असलेल्या मोहंमद शहजादकडून अपेक्षा होत्या. चार षटके चांगला तग धरल्यावर शहजाद चोरटी धाव घेताना तो धावबाद झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एक एक फलंदाजांची शिकार करायला जास्त कष्ट करावे लागले नाहीत. कधी चांगला चेंडू तर कधी खराब फटका फलंदाज बाद व्हायला कारण ठरत गेले. ईशांत शर्माने दोन फलंदाजांना आत येणाऱ्या चेंडूवर त्रिफळाचित केले. आश्विनच्या गोलंदाजीचा अंदाज कोणालाच येत नव्हता. चार फलंदाजांना त्याने गोंधळात टाकून बाद केले. रवींद्र जडेजाने दोन फलंदाजांना बाद करून अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांवर गुंडाळला. 

गोलंदाज थकले नव्हते आणि मोठी आघाडी हाती असल्याने अजिंक्‍य रहाणेला अफगाणिस्तानला परत फलंदाजीला बोलवायला विचार करावा लागला नाही. दुसऱ्या डावाची सुरुवातही भयानक झाली. उमेश यादवने मोहंमद शहजाद, जावेद अहमदी आणि मोहंमद नबीला पाठोपाठ बाद केले. रहमत शहा बाद झाल्यावर कर्णधार स्टानिकझाईने जरा तग धरला. सव्वा तास संयम ठेवलेल्या स्टानिकझाईने जडेजाला हवेतून फटका मारायचा प्रयत्न फसला आणि विजयाचे दार उघडले गेले. शाहीदीचा अपवाद वगळता एकाही फलदांजाने लढत देण्याची जिद्द दाखवली नाही. आश्विनने वफादारला बाद करून भारताचा विजय निश्चित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India win by an innings and 262 runs