पदार्पणाच्या सामन्यात अफगाणिस्तानची दाणादाण

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 16 June 2018

संक्षिप्त धावफलक 
भारत पहिला डाव 474 (मुरली विजय 105, शिखर धवन 107, हार्दिक पंड्या 71, यामिन अहमदझाई 3-51, वफादार 2-100, रशीद खान 2-154) वि.वि. अफगाणिस्तान 109 (महंमद नाबीद 24, अश्‍विन 4-27, ईशांत शर्मा 2-28, जडेजा 2-18) आणि 103 (हशमतउल्ला शाहिदी 36, स्टॅनिकझाई 25, जडेजा 4-17, उमेश यादव 3-26, ईशांत शर्मा 2-17). 

बंगळूर - कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे पाऊल अपयशी ठरले. भारताच्या अनुभवापुढे सर्वच आघाड्यांवर अफगाणिस्तान निष्प्रभ ठरले. मर्यादित षटकांचा पगडा असलेल्या त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या फलंदाजांना दोन्ही डावांत मिळून 90 षटकांचाही सामना करता आला नाही. दोन्ही डाव मिळून त्यांचे फलंदाज 66.3 षटके खेळले. पहिला डाव 27.5 षटकांत 109 धावांत आटोपल्यावर, त्यांचा दुसरा डाव 38.4 षटकांत 103 धावांतच गुंडाळला गेला. भारताने दुसऱ्या दिवशीच 1 डाव 262 धावांनी कसोटी कारकिर्दीमधील मोठा विजय मिळविला. 

अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी निराशा केली असली तरी, दुसऱ्या दिवशी भारताच्या हार्दिक पंड्याने कसोटी क्रिकेटला साजेशी समंजस फलंदाजी करून आपली छाप पाडली. त्याने केलेल्या 71 धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 450 धावांचा टप्पा ओलांडण्यास अडचण आली नाही. भारताचा पहिला डाव 474 धावांत संपुष्टात आला. अफगाणिस्तानकडून अहमदझाईने 51 धावांत 3 गडी बाद केले. त्यांचे प्रमुख अस्त्र असलेल्या रशीद खानने दोन गडी बाद केले; पण त्याला 154 धावांचे मोल मोजावे लागले. 

भारताच्या धावसंख्येला उत्तर देताना अफगाणिस्तानच्या पवित्र्याकडे लक्ष होते. त्यांना मोहंमद शहजादकडून अपेक्षा होत्या. त्याने चांगला तगदेखील धरला, पण चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. त्यानंतर त्यांचे अन्य फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर ढेर झाले. कधी चांगला चेंडू, तर कधी खराब फटक्‍याने पाहुण्यांचे फलंदाज बाद झाले. अश्‍विनच्या फिरकीचा अंदाज कुणालाच आला नाही. जडेजाची फिरकीही त्यांना धडे देणारी ठरली. त्यामुळे त्यांचा पहिला डाव 109 धावांत आटोपला. 

भारतीय कर्णधार अजिंक्‍य रहाणेने फॉलोऑनचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावांतही चित्र वेगळे दिसले नाही. या वेळी उमेश यादवने त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज परत पाठवले. त्यानंतर कर्णधार स्टॅनिकझाईने सव्वा तास दाखवलेला संयम हीच काय ती अफगाणिस्तानसाठी जमेची बाजू ठरली; पण तो बाद झाला आणि भारताने नंतर झटपट डाव गुंडाळत मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक 
भारत पहिला डाव 474 (मुरली विजय 105, शिखर धवन 107, हार्दिक पंड्या 71, यामिन अहमदझाई 3-51, वफादार 2-100, रशीद खान 2-154) वि.वि. अफगाणिस्तान 109 (महंमद नाबीद 24, अश्‍विन 4-27, ईशांत शर्मा 2-28, जडेजा 2-18) आणि 103 (हशमतउल्ला शाहिदी 36, स्टॅनिकझाई 25, जडेजा 4-17, उमेश यादव 3-26, ईशांत शर्मा 2-17). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Win By An Innings And 262 Runs