'वन-डे' मालिकेतही भारताचा विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

150 युवराजची एकदिवसीय स्पर्धेतील सर्वोच्च खेळी. यापूर्वी 139 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 
256 धोनी-युवराजची चौथ्या विकेटासाठी झालेली भागादारी 
10 व्यांदा धोनी युवराजची शतकी भागीदारी 
16 डावांनंतर युवराजचे एकदिवसीय सामन्यात शतक. यापूर्वी 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध. 

कटक - पुण्यात विराट कोहली आणि केदार जाधव या नव्या पिढीच्या फलंदाजांनी मैदान गाजविल्यानंतर कटकमध्ये युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या अगोदरच्या पिढीतील धुरंधरांनी... हम भी कुछ कम नही, हे सिद्ध करणारी चौकार-षटकारांची शतकी तुफानी टोलेबाजी केली. त्यामुळे 381 धावांचा डोंगर उभा करूनही इंग्लंडच्या जोरदार प्रतिकारामुळे भारताला अखेर 15 धावांच्या विजयावर समाधान मानावे लागले. 

पुण्यात भारताने साडे तीनशे धावांचे लक्ष्य पार करण्याची जिगर दाखवली होती कटकमध्ये इंग्लंडने प्रयत्न केले, परंतु भारताची धावसंख्या आवाक्‍याबाहेरची ठरली. फलंदाजीस उपयुक्त असलेली खेळपट्टी रात्री पडलेले दव यामुळे भारतीय गोलंदाजांना लढावे लागणार हे उघड होते. जेसन रॉय (82), ज्यो रूट (54), कर्णधार मॉर्गन (102) आणि मोईन अली (55) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे सामन्यातील रंगत अखेरपर्यंत टिकून होती. अखेरचे नऊ चेंडू असताना मॉर्गन बाद झाला आणि भारताचा विजय नक्की झाला. 

तत्पूर्वी, पुणे आणि कटक येथील या सामन्यात भारतीय फलंदाजीत बरेचसे साम्य होते. फरक धावांचा पाठलाग करण्याचा आणि प्रथम फलंदाजीत धावा करण्याचा होता. त्या सामन्यात 3 बाद 56 अशी भारताची अवस्था झाली होती आणि त्यानंतर विराट कोहली-केदार जाधवचे तुफान आले होते. आज 3 बाद 25 अशी दयनीय परिस्थिती झाल्यावर युवराज-धोनी यांचे वादळ आले. या दोघांनी साडेसहाच्या सरासरीने 256 धावांची भागीदारी केली. त्यामध्ये 31 चौकार आणि 9 षटकारांची जबरदस्त टोलेबाजी झाली. 

..तो व्हिडिओ आणि धोनीचा शब्द 
प्रथम श्रेणीच्या धोनीच्या नेतृत्वाखालील अखेरच्या सामन्यानंतर (ब्रेबॉर्नवरील सराव सामना) युवराजने धोनीच्या खांद्यावर हात ठेवलेला लाइव्ह व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये त्याने धोनीला उद्देशून माझ्यासाठी षटकार मारशील? अशी विचारणा केली होती. आज धोनीने सहा षटकार मारून आपला शब्द खरा केला. 

2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतरची युवराजने शतक केले. त्याच्या सुरवातीच्या काही फटक्‍यांवरून 2011 चा युवराज दिसू लागला होता. कव्हर ड्राईव्ह, फ्लिक्‍स, पूल आणि स्टेट ड्राईव्हसाठी मारलेला एक पंच मंत्रमुग्ध करणारा होता. मुळात युवराजच्या खेळीत कोणतेही दडपण नव्हते. शंभरपेक्षा अधिक धावांच्या स्ट्राईक रेटने तो टोलेबाजी करत होता. 98 चेंडूत त्याने आपले 14 वे शतक पूर्ण केले; पण शतकानंतर त्याचा वेग अधिकच वाढला. दीड शतकानंतर तो बाद झाला. या 150 धावांपैकी 102 धावा त्याने चौकार आणि षटकारानेच पूर्ण केल्या (21 चौकार, 3 षटकार). 

धोनीचा तडाखा 
एकीकडे युवराजचे राज सुरू असताना धोनी सहायकाची भूमिका बजावत होता; पण 30 षटकांनंतर त्याने गिअर बदलला. प्रथम त्याने मोईन अलीला टार्गेट केले आणि त्यानंतर सर्व इंग्लंड गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरवात केली. 134 धावांच्या खेळीत मारलेले 10 चौकार आणि सहा षटकार धोनीमध्ये अजूनही मोठी टोलेबाजी करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध करणारी होती. 

धावफलक 
भारत 

लोकेश राहुल झे. स्टोक्‍स गो. वोक्‍स 5, शिखर धवन त्रि. गो. वोक्‍स 11, विराट कोहली झे. स्टोक्‍स गो. वोक्‍स 8, युवराज सिंग झेय बटलर गो. वोक्‍स 150 (127 चेंडू, 21 चौकार, 3 षटकार), महेंद्रसिंह धोनी झे. विली गो. प्लंकेट 134 (122 चेंडू, 10 चौकार, 6 षटकार), केदार जाधव झेय बॉल गो. प्लंकेट 22, हार्दिक पांड्या नाबाद 19, रवींद्र जडेजा नाबाद 16, अवांतर 16, एकूण 50 षटकांत 6 बाद 381 
गडी बाद क्रम ः 1-14, 2-22, 3-25, 4-281, 5-323, 6-358 
गोलंदाजी ः ख्रिस वोक्‍स 10-3-60-4, डेव्हिड विली 5-0-32-0, जॅक बॉल 10-0-80-0, लियाम प्लंकेट 10-1-91-2, बेन स्टोक्‍स 9-0-79-0, मोईन अली 6-0-33-0 

इंग्लंड 
जेसन रॉय त्रि. गो. जडेजा 82, ऍलेक्‍स हेल्स झे. धोनी गो. बुमरा 14, ज्यो रुट झे. कोहली गो. अश्‍विन 54, इयॉन मॉर्गन धावबाद 102 (81 चेंडू, 6 चौकार, 5 षटकार), बेन स्टोक्‍स त्रि. गो. अश्‍विन 1, जोस बटलर यष्टि. धोनी गो. अश्‍विन 10, मोईन अली त्रि. गो. भुवनेश्‍वर 55, ख्रिस वोक्‍स त्रि. गो. बुमरा 5, लियाम प्लंकेट नाबाद 25, डेव्हिड विली नाबाद 5, अवांतर 12, एकूण 50 षटकांत 8 बाद 366 
गडी बाद क्रम ः 1-28, 2-128, 3-170, 4-174, 5-206, 6-299, 7-304, 8-354, 
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर 10-1-63-1, जसप्रीत बुमरा 9-0-81-2, रवींद्र जडेजा 10-045-1, हार्दिक पांड्या 6-0-60-0, आर. आश्‍विन 10-0-65-3, केदार जाधव 5-0-45-0 

Web Title: India win ODI series