मालिकेत साधली बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

बाजी पलटवत भारताचा बहारदार विजय

बाजी पलटवत भारताचा बहारदार विजय
बंगळूर - क्रिकेटच्या खेळातील आकडे फसवे असतात. विजयाकरिता दोनशेपेक्षा कमी धावांचे लक्ष्य कागदावर फार तुटपुंजे दिसते; पण जेव्हा गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर प्रचंड दडपणाखाली छोट्या वाटणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करायची वेळ येते, तेव्हा भल्या भल्या संघांची भंबेरी उडते. बंगळूरला नेमके हेच चित्र बघायला मिळाले. पुजारा-रहाणेच्या 118 धावांच्या बहुमूल्य भागीदारीच्या जोरावर भारताने 188 धावांचे आव्हान उभे केले. ज्याचा पाठलाग करताना ऑसी फलंदाजांच्या कपाळाला घाम फुटला. भारताने 75 धावांनी विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली.

चौथ्या दिवशी आश्‍विनने सहा फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 112 धावांत आटोपला. कठीण खेळपट्टीवर दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा राहुल "सामनावीर' ठरला. चौथ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर रहाणे आणि पुजाराने दमदार फलंदाजी केली. रहाणेचे अर्धशतक पूर्ण झाले. 80 षटके झाल्यावर लगेच दुसरा नवा चेंडू घेण्याचा निर्णय म्हणजे दुधारी तलवार होती. स्टार्कने लागोपाठच्या दोन चेंडूंवर रहाणे आणि नायरला बाद करून ऑस्ट्रेलिया संघात चैतन्य परत आणले. समोरून हेझलवूडने पुजाराचा बचाव भेदला आणि नंतर लगेच आश्‍विनला बाद केले. साहाने तळात थोडी टोलेबाजी करून भारताला 187 धावांची आघाडी मिळवून दिली. सहा फलंदाजांना बाद करणारा हेझलवूड हिरो ठरला.

ऑसी संघाला रोखण्याकरिता सतत फलंदाजांना बाद करणे हाच एकमेव उपाय होता. ईशांतने चिवट रेनशॉला बाद करून झकास सुरवात संघाला करून दिली. स्मिथ-वॉर्नरची जोडी सर्वांत धोकादायक होती. वॉर्नरने आश्‍विनला षटकार मारून वर्चस्व प्रस्थापित करायचा मार्ग अवलंबला. जिगरी आश्‍विनने वॉर्नरला पायचीत करून बाजी मारली. नंतर मैदानावर नाट्य घडले. उमेशच्या गोलंदाजीवर पंचांनी स्मिथला पायचीत दिले असता स्मिथने पॅव्हेलियनकडे बघून सल्ला घ्यायचा केलेला प्रयत्न नियमांची पायमल्ली करणारा होता. विराट त्या कृतीवर जाम भडकला; तसेच पंचांनीही स्मिथला लगेच टोकले. स्मिथ बाद झाला आणि विजयाचा प्रवास चालू झाला.

दडपणाखाली एक एक ऑसी फलंदाज कोलमडताना बघायला मिळाला. आश्‍विनच्या फिरकीचा अंदाज कोणाला येत नव्हता. कधी बचाव करताना; तर कधी आततायी फटका मारायच्या प्रयत्नात एक एक फलंदाज तंबूत परतत राहिला. अखेर नॅथन लायनला स्वतःच्यात गोलंदाजीवर झेल पकडून बाद करताना आश्‍विनने भारताचा बहारदार विजय साकारला. भारतीय खेळाडू आणि चिन्नास्वामी मैदानावरचे प्रेक्षक आनंदाने बेभान होऊन नाचू लागले.

दृष्टिक्षेपात 
- भारत 75 धावांनी विजयी. 200 पेक्षा कमी धावांचे लक्ष्य असताना तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय. यापूर्वी 1996-97 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 170 धावांचे लक्ष्य देऊन 64 धावांनी सरशी. 
- ऑस्ट्रेलियाच्या 11 धावांत सहा विकेट. सहा विकेटची तिसऱ्या क्रमांकाची घसरगुंडी. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारताच्या 11 धावांत सात विकेट. 
- भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980-81 मध्ये मेलबर्नला 143, तर 2004-05 मध्ये मुंबईत 107 धावांचे लक्ष्य देऊन विजय नोंदविला. 
- पुजारा "नर्व्हस नाईंटी'मध्ये प्रथमच बाद. यापूर्वी दहा वेळा नव्वदी पार केल्यानंतर प्रत्येक वेळी शतक. 
- हेझलवूडच्या 65 धावांत सहा विकेट. कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी. 
- या मालिकेत ओकीफ आणि लायन यांचीसुद्धा कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी. 
- आशियामध्ये लायनच्या पहिल्या व दुसऱ्या डावातील सरासरीत 16.98 चा फरक. पहिल्या डावात 30.84 च्या सरासरीने 38 विकेट. यात तीन वेळा डावात पाच किंवा जास्त विकेट. दुसऱ्या डावात माभ 47.82च्या सरासरीने 17 विकेट. यात एकदाही पाच विकेटची कामगिरी नाही. 

अफलातून अश्‍विन 
- कसोटीच्या डावात 25व्या वेळी पाच किंवा जास्त विकेटची कामगिरी. 
- अशी कामगिरी करणारा कसोटी इतिहासातील दहावा गोलंदाज. 
- 25 वेळा अशी कामगिरी सर्वाधिक कमी कसोटींमध्ये करण्याचा विक्रम. 
- न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली यांचा 62 कसोटींचा विक्रम मोडला. 
- अशा कामगिरीसाठी कुंबळेला 86, तर हरभजनला 93 कसोटी खेळाव्या लागल्या. 
- अश्‍विनच्या खात्यात 269 विकेट. सर्वाधिक विकेटच्या क्रमवारीत भारताचा पाचव्या क्रमांकाचा गोलंदाज. बिशन बेदी यांचा 266 विकेटचा टप्पा मागे टाकला. 
- मायदेशात 30 कसोटींमध्ये 200 विकेटचा टप्पा, भारतातर्फे अशी कामगिरी केलेल्या चार गोलंदाजांमध्ये सर्वांत कमी कसोटीत हा टप्पा 

माझी चूक होती - स्मिथ 
पायचीतच्या निर्णयावर तिसऱ्या पंचांकडे दाद मागायची का नाही, याचा सल्ला पॅव्हेलियनकडे बघून मागायचा मी केलेला प्रयत्न बरोबर नव्हता. चूक माझी होती. जणू त्या क्षणाला माझा मेंदू बधिर झाला होता, असे स्मिथने सांगितले. कसोटीविषयी तो म्हणाला की, पहिल्या डावात भारतीय संघाला लवकर बाद करून खरे तर सूत्रे आम्ही हाती घेतली होती. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी फारच टिच्चून गोलंदाजी केली आणि आम्हाला धावा करू दिल्या नाहीत. परत तिसऱ्या दिवशी आम्हाला संधी होती. त्या वेळी पुजारा-रहाणेची भागीदारी आमच्या नाशाला कारण ठरली. खेळपट्टीचा विचार करता 188 धावांचा पाठलाग करणे कठीण होते; पण अशक्‍य नव्हते. दोन चांगल्या भागीदाऱ्या केल्या तर ते शक्‍य होते. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना खेळतात तेव्हा काही ठिणग्या उडतात. मैदानावर बोलाचाली चालू होती; पण कोणी मर्यादा ओलांडली नाही. मैदानावरच्या गोष्टी मैदानावर राहिल्या तर अशा सकारात्मक खुन्नसने क्रिकेटला धार येते, असे मला वाटते. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे, कारण आम्ही भारताला पुनरागमनाची संधी दिली. आता वरचढ खेळाचे ध्येय आम्हाला ठेवावे लागेल. 

तुम्ही सापाचे डोके ठेचा - विराट कोहली 
मला समजले आहे की ऑसी संघ सतत सापाचे डोके ठेचायचाच विचार करत आहे. म्हणजे विराट कोहलीला बाद केले की भारतीय संघ कोलमडेल असा त्यांचा भ्रम आहे. माझी हरकत नाही. जर त्यांनी लक्ष फक्त माझ्यावर केंद्रित केले तर माझ्या सहकाऱ्यांना ठसा उमटवायला अजून संधी उपलब्ध होतील. बंगळूर सामन्यात दोन्ही डावात मला अपेक्षित कामगिरी करता आली नाही तरी, आम्ही बाजी पलटवत 75 धावांनी विजय मिळवला. माझ्या कप्तानीच्या कारकिर्दीतील हा सर्वांत "गोड' विजय म्हणेन मी. 

तिसऱ्या पंचांकडे दाद मागताना ऑसी संघातील काही खेळाडू गुपचूप पॅव्हेलियनकडे इशारा करून सल्ला मागून नियमांचे उल्लंघन करतात, ही गोष्ट दोन वेळा माझ्या निदर्शनास आली होती. सामना अधिकारी आणि मैदानावरील पंचांनाही मी ते सांगितले होते. म्हणूनच स्मिथला पायचित देण्याच्या निर्णयानंतर तसेच करायचा प्रयत्न केला गेला तेव्हा पंचांनी लगेच त्याला रोखले. हे अचानक झाले नाही, हे सतत होत होते म्हणून ही फक्त "चूक' आहे असे मला वाटत नाही. 

गेल्या दहा दिवसात बरेच काही घडले. पुण्यातील सामना अडीच दिवसात गमावल्यावर मी सांगितले की, आत्तापर्यंत विजय साथीने उपभोगला आणि पराभवही एकत्र पचवूयात. आम्ही कोणी घरी न जाता एकत्र राहिलो. वेगळ्या प्रकारे मन शांत केल्यावर आम्ही बंगळूर कसोटीच्या तयारीला लागलो. पहिल्या डावातील खराब फलंदाजीनंतर गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी केलेला मारा आम्हाला सामन्यात परत घेऊन आला. तसेच दुसऱ्या डावात पुजारा - रहाणेची भागीदारी निर्णायक ठरली. अश्‍विनने दुसऱ्या डावात सहा फलंदाजांना बाद करताना फिरकीचे विणलेले जाळे कमालीचे होते. या सगळ्याचा विचार करता हा विजय अजून गोड वाटतोय. 

धावफलक 
भारत - पहिला डाव - 189 
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - 276 
भारत - दुसरा डाव - राहुल झे. स्मिथ गो. ओकीफ 51, मुकुंद त्रि. गो. हेझलवूड 16, पुजारा झे. मिचेल मार्श गो. हेझलवूड 92-221 चेंडू, 7 चौकार, विराट पायचीत गो. हेझलवूड 15, जडेजा त्रि. गो. हेझलवूड 2, रहाणे पायचीत गो. स्टार्क 52-134 चेंडू, 4 चौकार, नायर त्रि. गो. स्टार्क 0, साहा नाबाद 20, अश्‍विन त्रि. गो. हेझलवूड 4, उमेश झे. वॉर्नर गो. हेझलवूड 1, ईशांत झे. शॉन मार्श गो. ओकीफ 6, अवांतर 15, एकूण 97.1 षटकांत सर्वबाद 274 
बाद क्रम - 1-39, 2-84, 3-112, 4-120, 5-238, 6-238, 7-242, 8-246, 9-258. 

गोलंदाजी - स्टार्क 16-1-74-2, हेझलवूड 24-5-67-6, लायन 33-4-82-0, ओकीफ 21.1-3-36-2, मिचेल मार्श 3-0-4-0 
ऑस्ट्रेलिया - दुसरा डाव ः वॉर्नर पायचीत गो. अश्‍विन 17-25 चेंडू, 1 षटकार, रेनशॉ झे. साहा गो. ईशांत 5, स्मिथ पायचीत गो. उमेश 28-48 चेंडू, 3 चौकार, शॉन मार्श पायचीत गो. उमेश 9, हॅंडसकॉम्ब झे. साहा गो. अश्‍विन 24-67 चेंडू, 2 चौकार, मिचेल मार्श झे. नायर गो. अश्‍विन 13, वेड झे. साहा गो. अश्‍विन 0, स्टार्क त्रि. गो. अश्‍विन 1, ओकीफ त्रि. गो. जडेजा 2, लायन झे. व गो. अश्‍विन 2, हेझलवूड नाबाद 0, अवांतर 11, एकूण 35.4 षटकांत सर्वबाद 112 
बाद क्रम - 1-22, 2-42, 3-67, 4-74, 5-101, 6-101, 7-103, 8-110, 9-110 
गोलंदाजी - इशांत 6-1-28-1, अश्‍विन 12.4-4-41-6, उमेश 9-2-30-2, जडेजा 8-5-3-1 

Web Title: india win test cricket match