दादाने 15 वर्षांपूर्वी लॉर्डसवर भिरकावला होता टी-शर्ट

टीम ई सकाळ
गुरुवार, 13 जुलै 2017

भारताच्या या विजयामुळे इंग्लंडला मायदेशात मोठ्या मानहानिला सामोरे जावे लागले. या विजयाचा आनंद सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. पण, कर्णधार गांगुलीची तो आनंदोत्सव आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारताचा लढाऊ कर्णधार सौरव गांगुलीने 15 वर्षांपूर्वी याच दिवशी इंग्लंडच्या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये टी-शर्ट भिरकावला होता. आजही क्रिकेटप्रेमी हा संस्मरणीय क्षण विसरू शकलेला नाही. याचनिमित्ताने आज पुन्हा एकदा या सामन्याची आठवण आम्ही करुन देत आहोत.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँण्ड्र्यू फ्लिन्टॉफने भारतात विजय मिळविल्यानंतर मैदानात टी-शर्ट काढून आनंद साजरा केला होता. याच मानहानिकारक पराभवाचा बदला भारतीय संघाला युवराजसिंग आणि मोहम्मद कैफ या युवा जोडीने मिळवून दिला. याच विजयामुळे सौरव गांगुली अर्थात दादाने चक्क टी-शर्ट काढून आनंद साजरा केला होता. इंग्लंडच्या 326 धावांचे आव्हान भारताने दोन गडी आणि 3 चेंडू राखून पार करत सर्वाधिक धावांचा पाठलाग केल्याचा विक्रम केला होता. भारताने यापूर्वी कधीही 300 पेक्षा अधिक धावांचे आव्हान गाठले नव्हते. गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नॅटवेस्ट करंडकातील हा विजय पुढील अनेक वर्षे या युवासाठी प्रेरणा देणारा ठरला.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 325 धावा केल्या होत्या. सलामीवीर मार्कोस ट्रॅस्कोथिकने 109 आणि कर्णधार नासीर हुसेनने 115 धावा केल्या होत्या. झहीर खान, हरभजनसिंग आणि अनिल कुंबळे असे दिग्गज गोलंदाज असूनही भारताला इंग्लंडच्या फलंदाजांना रोखता आले नव्हते. या आव्हानपुढे भारतीय संघ किती धावा करेल, हा प्रश्नच होता. सेहवाग आणि गांगुली यांनी शतकी सलामी देत सुरवात चांगली करून दिली. पण, गांगुली अर्धशतकानंतर 60 धावांवर बाद झाल्यानंतर सेहवागही लगेच परतला. दिनेश मोंगिया, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर ही मधली फळी पूर्णपणे कोलमडल्याने पूर्ण जबाबदारी युवराजसिंग आणि मोहम्मद कैफ या युवा खेळाडूंवर आली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत संघाला विजयाजवळ नेले. पण, युवराज 69 धावांवर बाद झाल्याने आशा मावळल्या होत्या. अखेर कैफने जिद्दीने हरभजन आणि झहीरच्या साथीने संघाला ऐतिहासिक विजयापर्यंत नेले. कैफची ती 87 धावांची नाबाद खेळी अजरामर ठरली.

भारताच्या या विजयामुळे इंग्लंडला मायदेशात मोठ्या मानहानिला सामोरे जावे लागले. या विजयाचा आनंद सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला. पण, कर्णधार गांगुलीची तो आनंदोत्सव आजही सर्वांच्या स्मरणात आहे. नॅटवेस्ट करंडकाचे ते विजेतेपद पुढील वर्षीच झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत प्रेरणा देणारे ठरले. हाच भारतीय संघ 2003 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम स्पर्धेपर्यंत गेला होता. भारतीय संघाने आतापर्यंत अनेक संस्मरणीय विजय मिळविलेले आहेत. पण, 15 वर्षांपूर्वी मिळविलेल्या या विजयाची मजा काही वेगळीच होती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India won the NatWest Trophy in dramatic fashion in 2002 against England