भारताचा इंग्लंडवर प्रतिहल्ला

सुनंदन लेले 
Monday, 20 August 2018

ट्रेंट ब्रिज - पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहणारी इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हार्दिक पंड्यासमोर गडबडली. दुसऱ्या सत्रात त्यांचा डाव १६१ धावांतच आटोपला. भारताने पहिल्या डावात १६८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर दुसऱ्या डावात भक्कम फलंदाजी करताना २ बाद १२४ धावा करीत ही आघाडी २९२ धावांपर्यंत वाढवली. खेळ थांबला तेव्हा चेतेश्‍वर पुजारा ३३, तर विराट कोहली ८ धावांवर खेळत होता. 

दुसऱ्या नव्या चेंडूने दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले; पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच नव्या चेंडूंवर इंग्लंडच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. पहिला डाव ३२९ धावांत रोखला गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांवरच गुंडाळला. हार्दिक पंड्याचे पाच बळी आणि पदार्पणातच रिषभ पंतने यष्टीमागे टिपलेले पाच झेल हे दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  

अर्धा तास उशिराने खेळ सुरू झाल्यावर भारताचा दुसरा डाव आज २२ धावांची भर घालून ३२९ धावांत आटोपला. त्यानंतर उपाहारापर्यंत इंग्लंडच्या ॲलिस्टर कुक आणि किटॉन जेनिंग्ज या सलामीच्या जोडीने सहज फलंदाजी केली. उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात मात्र खेळाचे चित्र पालटले.  

ईशांत शर्माने ॲलिस्टर कुकला, तर समोरून बुमराने जेनिंग्जला बाद केले. पुढच्याच षटकांत लगेच ईशांतने ऑली पोपची विकेट मिळविली. हे तीनही झेल यष्टिरक्षक रिषभ पंतने घेतले. हार्दिक पंड्यावर रविवारी नॉटिंगहॅमची खेळपट्टी फिदा होती. पंड्याने प्रथम ज्यो रूटचा अडसर दूर केला. दुसऱ्या बाजूने शमीने बेन स्टोकसला झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर पंड्याने जॉनी बेअरस्टॉ, वोक्‍स रशीद आणि ब्रॉडला बाद करून धमाल उडवली. जोस बटलरने हाणामारी करून ३९ धावा केल्याने इंग्लंडला १६१ धावा तरी करता आल्या. 

दुसऱ्या डावात शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी धडाक्‍यात सुरवात केली. जम बसला असे वाटत असतानाच प्रथम राहुल (३६) आणि नंतर धवन (४४) बाद झाला. दिवस अखेरीस चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. 

संक्षिप्त धावफलक - 
भारत पहिला डाव ३२९, इंग्लंड पहिला डाव १६१ (जोस बटलर ३९, ॲलिस्टर कूक २९, किटॉन जेनिंग्ज २०, हार्दिक पंड्या ५-२८, जसप्रीत बुमरा २-३७, ईशांत शर्मा २-३२), भारत दुसरा डाव २ बाद १२४ (धवन ४४, राहुल ३६, पुजारा खेळत आहे ३३, कोहली खेळत आहे ८).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian England Test Cricket Match