प्रदूषणामुळे 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'चे सामने तिरूअनंतपुरममध्ये घेण्याचा प्रस्ताव

वृत्तसंस्था
Wednesday, 6 December 2017

दिल्लीतील प्रदूषित हवेत सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी 'मास्क' बांधून क्षेत्ररक्षण केले. यामुळे हा विषय पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला. त्यानंतर भारताच्या महंमद शमीलाही गोलंदाजी करताना त्रास झाला.

राजधानी दिल्लीला प्रदूषणाने घातलेल्या विळख्याचा प्रश्न श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंच्या आक्षेपामुळे जागतिक पातळीवर गेल्यानंतर आता दिल्लीत क्रिकेटचे सामने आयोजित करण्यावरून गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. आगामी 'आयपीएल'मधील 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' या संघाचे 'होम ग्राऊंड'वरील सर्व सामने दिल्लीएेवजी तिरूअनंतपुरममध्ये खेळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दिल्लीतील प्रदूषित हवेत सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी 'मास्क' बांधून क्षेत्ररक्षण केले. यामुळे हा विषय पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला. त्यानंतर भारताच्या महंमद शमीलाही गोलंदाजी करताना त्रास झाला. त्यामुळे आता दिल्लीमध्ये क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आता क्रिकेटपटूंना सामन्यादरम्यान असा त्रास पुन्हा होऊ नये, यासाठी केरळ क्रिकेट संघटनेच्या पदाधिका-यांनी 'आयपीएल'चे सामने दिल्लीएेवजी तिरूअनंतपुरममध्ये घेण्याची तयारी दर्शविली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठक 11 डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत वरील प्रस्तावावर चर्चा व्हावी, यासाठी केरळ क्रिकेट संघटनेचे सचिव जयेश जाॅर्ज आग्रही आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Premier League Delhi Daredevils Delhi Pollution Sri Lanka Test Cricket India IPL BCCI