भारतीय महिला क्रिकेट संघाला गुणांचा दंड

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज भारतीय महिला संघाला सहा गुणांचा दंड केल्याने आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील दरी अधिकच वाढल्याचे दिसून आले.

नवी दिल्ली - पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज भारतीय महिला संघाला सहा गुणांचा दंड केल्याने आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील दरी अधिकच वाढल्याचे दिसून आले.

भारतामधील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानकडून मिळत असलेल्या उघड पाठिंब्यामुळे त्यांच्याशी द्विपक्षीय मालिका खेळताना केंद्र सरकारची परवानगी आवश्‍यक असल्याचे माहीत असूनही आयसीसीने घेतलेल्या या निर्णयाबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदी ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शशांक मनोहर असल्यामुळे हा निर्णय ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांना अधिक लागल्याची चर्चा आहे. याचे परिणाम गंभीर होणार असल्याची देखील चर्चा आहे. नियम आणि अटींच्या नावाखाली महिला संघाला ‘लक्ष्य’ केले जात असल्याचे सांगून याचा निषेध म्हणून लंडनमध्ये होणाऱ्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेतून भारतीय संघ माघार घेऊ शकतो, असाही मतप्रवाह लगेचच पुढे आला आहे. 

या निर्णयाने संतप्त ‘बीसीसीआय’ने आयसीसीकडे निषेध नोंदवला आहे. मात्र, इकडे लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यावरून वेगळेच नाट्य घडत असल्यामुळे एकही पदाधिकारी थेट बोलण्यास तयार नाही. पाकिस्तानशी खेळण्यापूर्वी केंद्र सरकारशी परवानगी घ्यावी लागते, हे ‘आयसीसी’ला माहीत असूनही त्यांनी अशी कारवाई केल्याने आम्ही निराश आहोत, असे ‘बीसीसीआय’चा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला. हा अधिकारी म्हणाला,‘‘भारतीय जवान सीमेवर नाहक मारले जात आहेत. पाकिस्तान दहशतवादाला पाठीशी घालत आहे. हा तमाम भारतीयांच्या भावनांचा प्रश्‍न आहे. आयसीसी अध्यक्ष स्वतः हे जाणतात.’’

‘आयसीसी’ने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही या अधिकाऱ्याने दिला आहे. हा अधिकारी म्हणाला, ‘‘हा निर्णय म्हणजे पाकिस्तानशी खेळण्याची जबरदस्ती करण्याचा प्रकार आहे. महिला जर पाकिस्तानशी खेळू शकतात, तर मग पुरुष संघ का नाही, असे त्यांना यातून सुचावायचे असावे; पण हे कधीही घडणार नाही. आयसीसीने जर निर्णय मागे घेतला नाही, तर लंडनमध्ये होणाऱ्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेतून आम्ही महिला संघासह माघार घेऊ.’’
दरम्यान, लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

नवा संघर्ष शनिवारपासून
भारत आणि पाकिस्तान महिला संघांचा सहभाग असलेली आशियाई कप स्पर्धा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात नको, अशी भूमिका घेतली आहे. ही स्पर्धा साखळी पद्धतीची आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार २९ नोव्हेंबरला भारत - पाक लढत आहे. या स्पर्धेत बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, थायलंड यांचाही सहभाग आहे. या स्पर्धेतूनही भारत आता माघार घेऊ शकतो, असेही एका भारतीय पदाधिकाऱ्याने सांगितले.

हा निर्णय झाल्यानंतर काही तासांतच भारतीय महिला संघ थायलंडला रवाना होईल आणि तिथे ते पाकविरुद्ध खेळणार आहेत. सीमेवरील तणावामुळे दोन देशांत मालिका नकोत हे मलाही मान्य आहे; पण ही मालिका आयसीसी स्पर्धेचा भाग आहे हे सांगायला हवे होते. ही मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळता आली असती. 
- डायना एडल्जी

आयसीसी काय म्हणते
 भारतीय महिला संघाने आयसीसी महिला अजिंक्‍यपद स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे होते
 यात तीन सामन्यांचा समावेश होता. १ ऑगस्ट ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान ते होणार होते
 हे सामने भारताने न खेळल्यामुळे प्रत्येक सामन्याचे दोन याप्रमाणे सहा गुणांचा दंड करण्यात आला. हे सहा गुण पाकिस्तानला देण्यात आले
 भारत-पाकिस्तान या देशांमधील नात्याबद्दल आम्ही जाणून आहोत 
 मान्य होईल असे कोणतेच कारण बीसीसीआयने दिले नाही

मनोहरांविरुद्ध संताप
आयसीसीच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर हे भारतीय असूनही असा निर्णय झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट पसरली आहे. एका अधिकाऱ्याने, तर ‘मनोहर आता नुसते बीसीसीआयविरोधी नाही, तर भारतविरोधीही झाले. पाकिस्तानशी त्यांच्या देशात भारत कधीच खेळणार नाही हे माहीत असूनही त्यांनी या निर्णयाला पसंती दिली हे औरच आहे. त्यांना भारतीयांच्या भावनांशी काहीच घेणे-देणे नाही असेच दिसते,’ अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Web Title: Indian women's cricket team points penalty