फिरकीसमोर भारताची त्रेधातिरपिट;ऑस्ट्रेलियाचा विजय 

टीम इसकाळ
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

ओ कीफ व अन्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पहिल्या डावांत अवघी 40 षटके तग धरलेली भारतीय फलंदाजी दुसऱ्या डावांत उणेपुरे 34 षटकेही पूर्ण करु शकली नाही

पुणे - मायदेशात फिरकीपटूंस मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार करुन पाहुण्या संघांस धाराशयी करण्याचे नवे भारतीय धोरण आज (शनिवार) भारतावरच अत्यंत दुदैवी पद्धतीने उलटले! ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू स्टीव्ह ओ कीफ (35 धावा - 6 बळी) व नॅथन लिऑन (53 धावा - 4 बळी) यांच्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर या देशाने भारतास अवघ्या तीन दिवसांत पराभवाची धूळ चाखावयास लावली.

फिरकीचा सामना करण्यासाठी नाणावलेली भारतीय फलंदाजी या सामन्यातील पहिल्या डावांत 105 धावांत; तर दुसऱ्या डावांत 107 धावांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ओ कीफ व अन्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पहिल्या डावांत अवघी 40 षटके तग धरलेली भारतीय फलंदाजी दुसऱ्या डावांत उणेपुरे 34 षटकेही पूर्ण करु शकली नाही. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेमधील हा पहिला सामना तब्बल 333 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 441 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी जवळजवळ पहिल्याच डावाची पुनरावृत्ती केली. ओ कीफ व लिऑन यांच्या अचूक माऱ्यासमोर कुठलाही भारतीय फलंदाज टिकूही शकला नाही. चेतेश्‍वर पुजारा याने 58 चेंडूंत केलेल्या 31 धावा या भारतीय डावामधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. सलामीवीर मुरली विजय (2 धावा - 23 चेंडू), लोकेश राअहुल (10 धावा -9 चेंडू), विराट कोहली (13 धावा - 37 चेंडू) व अजिंक्‍य रहाणे (18 धावा - 21 चेंडू) या अन्य महत्त्वपूर्ण भारतीय फलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर नांग्या टाकल्या. 

या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे.
 

Web Title: India's big defeat against Australia