मोठ्या विजयासह भारताचे पुनरागमन 

सुनंदन लेले
Thursday, 23 August 2018

ट्रेंट ब्रीज : शेवटच्या फलंदाजाला बाद करून तिसरी कसोटी जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करायला भारतीय गोलंदाजांना तीन षटके लागली. अश्‍विनने अँडरसनला बाद करून भारताचा 203 धावांचा विजय नक्की केला. पहिल्या दोन सामन्यांत पराभव झाला असताना तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. दोन्ही डावांत मिळून एकूण 200 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. 

ट्रेंट ब्रीज : शेवटच्या फलंदाजाला बाद करून तिसरी कसोटी जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करायला भारतीय गोलंदाजांना तीन षटके लागली. अश्‍विनने अँडरसनला बाद करून भारताचा 203 धावांचा विजय नक्की केला. पहिल्या दोन सामन्यांत पराभव झाला असताना तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. दोन्ही डावांत मिळून एकूण 200 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. 

आदिल रशिदने अँडरसनसह माफक प्रतिकार केला. अश्‍विनला मारायच्या प्रयत्नात अँडरसनचा सोपा झेल अजिंक्‍य रहाणेने पकडला, तेव्हा भारतीय संघाने जास्त गाजावाजा न करता 203 धावांचा विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय संघाने विजयोत्सवसुद्धा जास्त साजरा केला नाही, इतके निर्विवाद वर्चस्व तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने गाजवले. 

भारताला गृहीत धरले नव्हते 
आम्ही भारतीय संघाला गृहीत धरले नव्हते. पहिल्या दिवशी खेळपट्टीतील जिवंतपणा आमच्या वेगवान गोलंदाजांना सहायक होईल, अशी अपेक्षा मी केली होती; परंतु भारतीय फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे त्यांना चांगली धावसंख्या उभारता आली. फलंदाजीत आम्ही सातत्य राखत नाही, हे चांगले लक्षण नाही. प्रत्येक वेळी आमच्या अष्टपैलू खेळाडूंनी संघाला सुस्थितीत नेले हे मी मान्य करेन. भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रांतांत आम्हाला मागे टाकले, म्हणूनच ते तिसरा कसोटी सामना जिंकू शकले, असे इंग्लंड कर्णधार ज्यो रूटने सांगितले. 

तीनशे धावा होताच चित्र बदलले : शास्त्री 
भारताच्या या विजयाविषयी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, की लॉर्डस्‌ कसोटीत पराभव झाला तरी सराव कमी करायचा आणि विश्रांती घेताना डोक्‍यातील जळमटं काढून टाकायची, असे मी ठरवले. प्रत्येकाने आपली जबाबदारी काय हे मनात पक्के करायचे. शतक करायचे असेल तर 5-6 तास फलंदाजी करावी लागेल. तसेच, खूप चेंडूंवर तुम्ही चकणार; कारण समोर एकत्र मिळून जवळपास 1000 फलंदाजांना बाद करणारे अँडरसन- ब्रॉड आहेत. तेव्हा खराब खेळूनही जास्त काळ विकेटवर उभे राहण्याचा निग्रह करा. मागे जे झाले ते विसरून जा आणि फक्त वर्तमानाचा विचार करा, असे मी सर्वांना सांगितले. आमच्या फलंदाजांनी 300 धावा फलकावर लावल्या, तिथेच चित्र बदलू लागले. अजिंक्‍यने पहिल्या डावात आणि पुजाराने दुसऱ्या डावात केलेली खेळी मोलाची होती आणि मी विराटबद्दल काय बोलणार, त्याच्याकडे वेगळाच क्‍लास आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातला हा सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे आणि त्यांना क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त साथ दिली, असे शास्त्रींनी अभिमानाने सांगितले. 

एक विकेट आणि 10 पौंडाचे तिकीट 
एक फलंदाज बाद होण्याची औपचारिकता बाकी असूनही नॉटिंगहॅम कौंटीने पाचव्या दिवशीच्या खेळासाठी 10 पौंडचे तिकीट ठेवले. इंग्लंडचा पराभव नक्की असूनही सुमारे 500 प्रेक्षक ट्रेंट ब्रीज येथे उपस्थित होते. 

केरळ पूरग्रस्तांना विजय अर्पण 
नॉटिंगहॅमचा कसोटी सामना जिंकल्यावर विराट कोहलीने भारतीय संघाचा विजय केरळ पूर संकटातील पीडितांना अर्पण केला. "केरळमध्ये सध्या जी भयानक परिस्थिती आहे, त्याची आम्हा खेळाडूंना जाणीव आहे. तिसऱ्या कसोटीतील विजय आम्ही केरळ पुरातील पीडितांना अर्पण करतो आहोत,' अशा भावना विराटने व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's comeback with great wins