बांगलादेशाकडून भारताचा पराभव 

वृत्तसंस्था
Thursday, 7 June 2018

आशिया करंडकात महिलांची विजयी मालिका खंडित 

क्वालालंपूर - महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी बांगलादेश संघाने सनसनाटी विजय नोंदवताना भारतीय महिलांचा सात गडी राखून पराभव केला. 

बांगलादेश महिला संघाने कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतावर मिळविलेला हा पहिला विजय ठरला. एप्रिल 2013 पासून त्यांना भारताविरुद्ध सलग दहा सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. थायंलड आणि मलेशिया संघांवर मोठा विजय मिळविलेल्या भारतीय संघास आज त्यांच्या भरवशाच्या फलंदाजीने दगा दिला. 

प्रथम फलंदाजी करताना भारताला 20 षटकांत 7 बाद 141 असे रोखण्यात बांगलादेशाला यश आले. त्यानंतर त्यांनी 19.4 षटकांतच 3 गड्यांच्या मोबदल्यात हे अंतर पार केले. प्रत्येकी तीन सामन्यांनंतर आता भारत, श्रीलंका, पाकिस्तान यांचे प्रत्येकी चार गुण झाले असून, निव्वळ धावगतीच्या (+3.428) भारत गुणतक्‍त्यात आघाडीवर आहे. 

भारताकडून हरमनप्रीत कौर (42) आणि दिप्ती शर्मा (32) यांचे योगदान मोठे ठरले. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. पण, त्यासाठी त्यांनी सात षटके घेतली. या दोघी लागोपाठ बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला. अखेरच्या चार षटकांत भारताला केवळ 22 धावा करता आल्या. 

आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघही एकवेळ 3 बाद 49 असा अडचणीत आला होता. अखेरच्या चार षटकांत विजयासाठी 32 धावांची गरज असताना राजेश्‍वरी गायकवाडने टाकलेल्या 17व्या षटकांत फरगना हिने 12 धावा कुटल्या. त्यानंतर रुमानाने झूलनच्या षटकांत दहा धावांची कमाई करत बांगलादेशाचा विजय सुकर केला. 

संक्षिप्त धावफलक 
भारत 7 बाद 141 (हरमनप्रीत कौर 42, दीप्ती शर्मा 32, रुमाना अहमद 3-21) पराभूत वि. बांगलादेश 19.4 षटकांत 3 बाद 142 (फरगना हक नाबाद 52, रुमाना अहमद नाबाद 42)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's defeat from Bangladesh