हॉंगकॉंगविरुद्ध भारताची एकदिवसीय लढत अधिकृत 

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. 
 

नवी दिल्ली- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. 

ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे. हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि पाकिस्तानसह त्यांचा एका गटात समावेश करण्यात आला आहे. हॉंगकॉंग अजूनही आयसीसीचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना अजून एकदिवसीय सामने खेळण्याचा दर्जा मिळालेला नाही. 

सहयोगी सदस्य पात्रता स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत खेळू शकतो. पण, अशा वेळी त्यांच्या सामन्याला अधिकृत दर्जा मिळत नाही, असा आयसीसीचा नियम आहे. या वेळी मात्र हा नियम अपवाद ठरला आहे. यापूर्वी महिलांच्या टी- 20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत वि. थायलंड ही लढत अधिकृत धरण्यात आली नव्हती. 

आयसीसीने या वेळी हा नियम बाजूला ठेवून हॉंगकॉंगच्या भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांना अधिकृत मानण्यास परवानगी दिली आहे. "बीसीसीआय'सह आशियाई क्रिकेट समितीने या संदर्भात आयसीसीकडे विनंती केली होती. त्या विनंतीवर विचार करताना "आयसीसी'ने हा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias one day match official against Hong Kong in Asia Cup