ऑस्ट्रेलियन खेळाडू आता माझे मित्र नाहीत- कोहली

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

या पूर्ण मालिकेत प्रतिस्पर्धी संघासाठी मी सर्वांत मोठा धोका होतो. त्यांनी मला लक्ष्य करण्याची एक संधी सोडली नाही. मी या मालिकेत चांगली फलंदाजी करू शकलो नाही. आता समालोचकांना माझ्याविरोधात बोलण्याची संधी मिळाली आहे. पण, मला याच्याशी काही देणेघेणे नाही, माझ्यावर याचा काही परिणाम होणार नाही.

धरमशाला - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत मिळविलेला विजय हा आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आता माझे मित्र नाहीत, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळविला. धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र, त्यापूर्वी झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यांत कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील द्वंद्व पहायला मिळाले होते. आता कोहलीने थेट ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आता माझे मित्र नसल्याचे म्हटले आहे.

कोहली म्हणाला, की या पूर्ण मालिकेत प्रतिस्पर्धी संघासाठी मी सर्वांत मोठा धोका होतो. त्यांनी मला लक्ष्य करण्याची एक संधी सोडली नाही. मी या मालिकेत चांगली फलंदाजी करू शकलो नाही. आता समालोचकांना माझ्याविरोधात बोलण्याची संधी मिळाली आहे. पण, मला याच्याशी काही देणेघेणे नाही, माझ्यावर याचा काही परिणाम होणार नाही. पहिल्या कसोटीपूर्वी मी केलेली वक्तव्ये ऑस्ट्रेलियन संघाने चुकीची ठरविली. आता यापुढे मी असे वक्तव्य करणार नाही. घरात बसून ब्लॉग लिहिणे किंवा माईकवर बोलणे सोपे आहे. प्रत्यक्षात मैदानात उतरून सामना करणे कठीण आहे. मला वाटत होते की इंग्लंडविरुद्धचा विजय सर्वोत्तम होता, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील लढाई पाहता हा विजय सर्वश्रेष्ठ होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मैत्रीबाबत माझे विचार पूर्वी वेगळे होते. पण या मालिकेनंतर मला वाटत नाही ते माझे मित्र राहतील.

Web Title: INDvAUS: 'Aussie cricketers are no longer friends,' says Virat Kohli