भारतीय संघाने उभारली विजयाची गुढी

सुनंदन लेले 
बुधवार, 29 मार्च 2017

धरमशाला - भारतीय संघाने मंगळवारी अपेक्षित कामगिरी करताना चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून हरवत देशातील २७व्या कसोटी केंद्रावर विजयाची गुढी उभारली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. अव्वल क्रमांकासाठी आपणच लायक असल्याचे सिद्ध करून दाखवले. मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी म्हणून रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली. 

धरमशाला - भारतीय संघाने मंगळवारी अपेक्षित कामगिरी करताना चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून हरवत देशातील २७व्या कसोटी केंद्रावर विजयाची गुढी उभारली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. अव्वल क्रमांकासाठी आपणच लायक असल्याचे सिद्ध करून दाखवले. मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी म्हणून रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली. 

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात किरकोळीत रोखल्यावर भारतीय संघाला विजयासाठी केवळ १०६ धावांचे आव्हान होते. तिसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी बिनबाद १९ धावा करून त्याचा पाया रचला आणि आज चौथ्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला दोन गडी गमावून भारताच्या विजयाची गुढी उभारली. पॅट कमिन्सने विजयला बाद केल्यावर चेतेश्‍वर पुजारा चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. ऑस्ट्रेलिया मुसंडी मारणार असे उगाचच वाटू लागले. कर्णधार अजिंक्‍य रहाणे सावध खेळेल असाच तर्क सगळे बांधत होते. मात्र, रहाणेने या सगळ्यांच्या तर्कांना सुरूंग लावला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर त्याने सुरवातीपासून प्रतिहल्ला केला. कमिन्सला लागोपाठ दोन चौकार ठोकत आपले मनसुबे स्पष्ट केले. इतके करून तो थांबला नाही, तर कमिन्सला पुढच्याच षटकात लागोपाठ दोन वेळा त्याने षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाच्या आव्हानातील उरली सुरली हवादेखील काढून घेतली. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना गोलंदाजांना डोक्‍यावर चढवून चालत नाही, तर शिंगावर घेऊन त्यांना उधळून लावायचे हा रहाणेचा धडाका भारताला अलगदपणे विजयाच्या दारात घेऊन गेला.

रहाणेपूर्वी लोकेश राहुलनेदेखील अशीच आश्‍वासक सुरवात केली होती. राहुलच्या आक्रमकतेने ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सुरवातीला निराश झाले. विजयी धाव घेताना राहुलने मालिकेतील सहावे अर्धशतक साजरे करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुल ५१ आणि रहाणे ३८ धावांवर नाबाद राहिला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सामना संपल्यावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी एकमेकांशी औपचारिकता म्हणून हस्तांदोलन केले. पण, त्यांच्या देहबोलीतून त्यात कुठेही मित्रत्वाचा ओलावा दिसून आला नाही.

दृष्टिक्षेपात विजयरथ
    कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक देशाविरुद्धच्या अखेरच्या मालिकेत भारताचा मालिका विजय. झिंबाब्वे (२-०, २००५), पाकिस्तान (१-०, २००७), श्रीलंका (२-१, २०१५), दक्षिण आफ्रिका (३-०, २०१५), वेस्ट इंडिज (२-०, २०१६), न्यूझीलंड (३-०, २०१६), इंग्लंड (४-०, २०१६), बांगलादेश (१-०, २०१७), ऑस्ट्रेलिया (२-१, २०१७) यापूर्वी अशी कामगिरी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेची

    पहिला कसोटी सामना हरल्यावर मालिका जिंकण्याची भारताची चौथी वेळ. यातील दोनवेळा ही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (चालू मालिका आणि २०००-०१). अन्य दोन घटना इंग्लंडविरुद्ध १९७२-७३ आणि श्रीलंका २०१५. या सर्व मालिकेत भारताचा २-१ असाच विजय

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा सलग चौथा मालिका विजय. २००४-०५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव. त्यानंतर सर्व मालिकेत विजय.

‍    उपखंडात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा मालिका पराभव. भारत (२०१२-१३), पाकिस्तान (अमिराती २०१४-१५), श्रीलंका (२०१६) असे यापूर्वीचे तीन पराभव. 

    २०१६-१७ च्या मोसमात भारताचे दहा कसोटी सामन्यांत विजय. एका मोसमात सर्वाधिक ११ विजय ऑस्ट्रेलियाचे (२००५-०६), दहापैकी दहा विजय (१९९९-००), भारताचे यापूर्वी २००४-०५, २००९-१० आणि २०१२-१३ मालिकेत पाच विजय 

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ३००, भारत पहिला डाव ३३२, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव १३७, भारत दुसरा डाव : लोकेश राहुल नाबाद ५१ ७६ चेंडू, ९ चौकार, मुरली विजय झे. वेड गो. कमिन्स ८, चेतेश्‍वर पुजारा धावबाद ०, अजिंक्‍य रहाणे नाबाद ३८ २७ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, अवांतर ९ एकूण २३.५ षटकांत २ बाद १०६, 

गडी बाद क्रम ः १-४६, २-४६, 

गोलंदाजी ः पॅट कमिन्स ८-२-४२-१, जोश हेझलवूड ६-२-१४-०, स्टीव्ह ओकीफ ४.५-१-२२-०, नॅथन लायन ५-०-१९-०, 

सामन्यासह मालिकेचा मानकरी - रवींद्र जडेजा

Web Title: Inida beat australia