ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बडबडीने प्रेरणा मिळाली - अजिंक्‍य रहाणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

रांची - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलो तेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सारखी काही ना काही बडबड करत होते. मात्र, त्यामुळे गडबडून न जातो सर्वोत्तम खेळण्याची प्रेरणा आणि एकाग्रता राखण्यास मदत झाली, असे मत भारताचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतला फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने व्यक्त केले.

रांची - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलो तेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सारखी काही ना काही बडबड करत होते. मात्र, त्यामुळे गडबडून न जातो सर्वोत्तम खेळण्याची प्रेरणा आणि एकाग्रता राखण्यास मदत झाली, असे मत भारताचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतला फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने व्यक्त केले.

पहिल्या कसोटीसह दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात अजिंक्‍यला अपयश आले होते. याचे दडपण त्याच्यावर होते. भारताचा डावही अडचणीत होता. अशा परिस्थितीत पुजारा आणि रहाणे जोडीवर मोठ्या आशा होत्या. या जोडीने त्या सार्थ ठरवल्या. सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने झुकवण्यास हीच भागीदारी निर्णायक ठरली होती. या भागीदारीबाबत रहाणे म्हणाला, 'एकत्र आल्यावर आम्ही भक्कमपणे उभे राहायचे निश्‍चित केले. एकमेकांना सल्ला देण्याचे आवर्जून टाळले.

अगदीच संयम सोडून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकलाच, तर "आपामसे खेलना' असे दोनच शब्द वापरले. विराटची विकेट झटपट मिळविण्यात ते पुन्हा एकदा यशस्वी ठरले होते. त्यामुळे आण्ही जरा वेगळ्या पद्धतीने फलंदाजी केली. आम्ही स्टार्कला ओव्हर दि विकेट येऊ दिले नाही. त्यांनीही अश्‍विनचा धसका घेऊन स्टार्कच्या बुटांमुळे माती उकरली जाण्याची भीती बाळगली असावी. त्यांनी त्याला ओव्हर दि विकेट येऊ दिले नाही. आम्हाला फायदाच झाला. आमची नजर बसली आणि मग आत्मविश्‍वासही उंचावला.''

रहाणे बाद झाल्यावर आपल्या धावांवर कधीच समाधानी नसतो. मग, ते शतक असले तरी. मात्र, या वेळी रहाणे आपल्या अर्धशतकावरही समाधानी होता. तो म्हणाला, 'सामन्याची परिस्थिती लक्षात घेता तेथे शतकापेक्षा संघाचे यश महत्त्वाचे होते. एखादी विकेटही प्रतिस्पर्धी संघाचा आतमविश्‍वास उंचावण्यास फायदेशीर ठरते. त्या वेळी एखादी मोठी भागीदारी आवश्‍यक असते. ती आमच्याकडून झाली. त्यामुळेच मला ही अर्धशतकी खेळी खूप मोलाची वाटते. मी माझ्या खेळीवर पूर्ण समाधानी आहे.''

रांची म्हणजे धोनी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा रांचीचा. त्याच्या कारकिर्दीत रांचीत कसोटी सामना झाला नाही. मात्र, आता रांचीला कसोटी केंद्राचा दर्जा मिळाला आहे. धोनी भारतीय संघात नसला, तरी रांची म्हणजे धोनी आणि धोनी म्हणजे रांची असेच समीकरण येथे आजही आहे. रांचीच्या रस्त्यावरून फिरताना याची प्रचिती येते. शहरातील अशी एकही भिंत दिसणार नाही, की त्यावर धोनीचे चित्र नाही. येथे सबकुछ धोनीच असेच चित्र आहे.

Web Title: Inspiration for Australian players discussion