इंग्लंडमध्ये धावा केल्याने प्रमाणपत्र मिळते का?:इंझमाम

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

आपण पाकिस्तान संघाचे कर्णधार असताना भारतीय फलंदाजांपैकी सर्वाधिक भय वीरेंद्र सेहवाग याचे होते, असे इंझमाम यांनी सांगितले! ""सेहवाग हा धोकादायक होता कारण कसोटी वा एकदिवसीय सामन्यांत त्याने 80 धावा केल्या तर भारतीय संघाच्या 300 वा त्यापेक्षाही जास्त धावा व्हायच्या. तो जितका काळ खेळपट्टीवर असायचा; गोलंदाजांचे मनोधैर्य तितकेच खच्ची व्हायचे,'' असे इंझमाम यांनी सांगितले.

लाहोर - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारतीय कर्णधार विराट कोहली याच्याविषयी केलेल्या टिप्पणीचा पाकिस्तानचे माजी शैलीदार खेळाडू व पाकच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी असलेल्या इंझमाम-उल-हक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कोहली याच्या गुणवत्तेविषयी शंका घेण्याआधी अँडरसन याने भारतामध्ये बळी घेऊन दाखवावेत, असा टोला इंझमाम यांनी लगावला आहे.

भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडू फारसा उसळत नसल्याने; तसेच स्विंग होत नसल्याने कोहलीच्या फलंदाजीतील तांत्रिक दुबळेपणा उघड झाला नाही, असे विधान अँडरसन याने केले होते. इंझमाम यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

"अँडरसनने कोहलीबद्दल शंका घ्यावी, याचे आश्‍चर्य वाटते. कारण मी त्याला भारतात बळी घेताना पाहिलेले नाही. इंग्लंडमध्ये धावा केल्या तरच तुम्ही गुणवत्तापूर्ण फलंदाज असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते, असे अँडरसन याला वाटते काय? भारतीय उपखंडात खेळताना इंग्लिश व ऑस्ट्रेलियन फलंदाज अडखळत नाहीत काय? याचा अर्थ ते चांगले फलंदाज नाहीत वा तो संघ दुबळा आहे, असा होतो का? कसोटी सामन्यांमधील धावा या धावा असतात; त्या तुम्ही कोठे काढता, याला फारसे महत्त्व नाही,'' असे इंझमाम यांनी सांगितले.

"कोणत्याही फलंदाजाने धावा काढल्यामुळे संघ जिंकला आहे अथवा नाही, याला खरे महत्त्व आहे. एखाद्या फलंदाजाने 80 धावा काढून संघास विजय मिळवून दिला; तर त्या धावा 150 धावा काढूनही संघ पराभूत होण्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. कोहली हा गुणवत्तापूर्ण फलंदाज आहे. आणि त्याच्या फलंदाजीमुळे भारताची कामगिरी चांगली होते. एखाद्या फलंदाजाचे मूल्यमापन करण्याचा मापदंड हाच असावयास हवा. विराटमध्ये धावांची भूक आहे,'' असे इंझमाम यांनी कोहलीस स्पष्टपणे पाठिंबा दर्शविताना स्पष्ट केले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया त्यांच्या खेळाडूंना कायमच पाठिंबा दर्शवित असताना आशियाई देश मात्र त्यांच्याच संघाविषयी प्रश्‍न उपस्थित करतात, अशी बोलकी प्रतिक्रिया इंझमाम यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, आपण पाकिस्तान संघाचे कर्णधार असताना भारतीय फलंदाजांपैकी सर्वाधिक भय वीरेंद्र सेहवाग याचे होते, असे इंझमाम यांनी सांगितले! ""सेहवाग हा धोकादायक होता कारण कसोटी वा एकदिवसीय सामन्यांत त्याने 80 धावा केल्या तर भारतीय संघाच्या 300 वा त्यापेक्षाही जास्त धावा व्हायच्या. तो जितका काळ खेळपट्टीवर असायचा; गोलंदाजांचे मनोधैर्य तितकेच खच्ची व्हायचे,'' असे इंझमाम यांनी सांगितले.

Web Title: Inzamam lashes out at Anderson over comments on Kohli